Crime news: मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे, ज्यामध्ये तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईतून सराईत ड्रग डिलरला ताब्यात घेतले आहे.नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि अशा आरोपांखाली गुन्हे शाखेने मुंबई आणि पुण्यात मोठी कारवाई केली आहे. यात 4 जणांना अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले असून हे यातील 3 जणं उच्चशिक्षित असून एक सराईत तस्करी करणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यात तरुणाईमध्ये वाढणारे अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध विक्रीवर या प्रकारामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
पुण्यातील सिंहगड परिसरात अटक
पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक केली. अंशुल संतोष मिश्रा (27, बुलडाणा), आर्श उदय व्यास (25, मुंबई), आणि पियुष शरद इंगळे (22, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघे त्यांच्या ग्रुपमधील तरुणांना ओजीकुश गांजा, मेफेड्रोन आणि एलएसडी यांसारखे अमली पदार्थ विकत घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 19.45 लाख रुपयांचे 251 ग्रॅम ओजीकुश गांजा, 15 ग्रॅम मेफेड्रोन, आणि 62 मिलीग्राम एलएसडी जप्त केले. हे तिनही तरुण उच्चशिक्षित असून अंशुल बी.ए. पदवीधर असून,आर्श एका विमान कंपनीत नोकरीस होता. पियूषने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.हे तिघेजण त्यांच्या ग्रुपमधील काही तरुणांना अमली पदार्थ विक्री करीत होते.
मुंबईतून सराईत ड्रग डिलरला अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 6 ने गोवंडीच्या गौतम नगर परिसरातून फुरकान अन्सारी (28) या सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या 1,910 स्पास्मो प्रॉक्सीव्हॉन प्लस, नायट्राझेपाम, आणि क्लोनाझेपाम टॅब्लेट जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांची बाजारातील किंमत 24,295 रुपये असून, आरोपीकडून 53,000 रुपये रोख आणि एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.
फुरकान अन्सारीवर यापूर्वी चोरी, मारामारी, आणि अमली पदार्थ तस्करीचे 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच्याकडे नशेच्या गोळ्या कुठून आणल्या आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे.