मुंबई: पवई (Powai) परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर हिच्या हत्येच्या आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आलं आहे. ही हत्या सफाई कामगाराने केली असून पोलिसांनी त्याच्या अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे या हत्येचा उलगडा केला. आता ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली होती की आणखी काही उद्देश त्यामागे होता याचा तपास सुरू आहे. 


रविवारी एका 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर यांची तिचा राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासाच्या आत त्याच इमारतीत काम करणारा सफाई कामगाराला अटक करून या गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावला आहे. मात्र गेल्या काही दिवसात मुंबईत वारंवार तरुणींवर होणारे हल्ले, अत्याचार आणि हत्यांचे गुन्हे वाढल्याने मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


24 वर्षांची रुपल ओगर हीचे स्वप्न अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार होतं. ती तिचे प्रशिक्षण पूर्ण करून एअर इंडियात फ्लाइट अटेंडंट म्हणून रुजू होणार होती. पण दुर्दैवाने तिची हत्या करण्यात आली. रुपल ही छत्तीसगडची रहिवासी होती जी गेल्या सहा महिन्यांपासून तिची बहीण आणि मित्रासोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. पवई एन जी कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ती राहत होती. रुपलची बहीण आणि मित्र गावी गेले होते आणि ती सध्या एकटी राहत होती. रविवारी 12 वाजल्यापासून तिचे कुटुंबीय तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण रुपलने फोनवर उत्तर न दिल्याने कुटुंबीयांनी रुपलच्या एका मित्राशी बोलून रुपलची माहिती घेण्यास सांगितले.


रात्री साडेदहा वाजता रुपलचा मित्र तिच्या घरी पोहोचला. तिने दार न उघडल्याने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला तेव्हा आत रूपलचा मृतदेह आढळून आला.  त्यानंतर 100 नंबर डायल करून पोलिसांना बोलावण्यात आले आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला.


पवई पोलिसांनी या प्रकरणात भा द वि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने सुरू केला. पवई पोलिसांनी आठ विविध पथकं तयार केले होते आणि तांत्रिक मदतीच्या आधारे तपास सुरू केला. या प्रकरणी सुमारे 30 ते 35 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ज्यामध्ये बिल्डिंगचे सेक्रेटरी, सेक्युरिटी आणि इतर लोकांचे जबाब घेण्यात आले होते.


मात्र आरोपीच्या अंगावर असलेल्या जखमाने पोलिसांना संशय आला आणि त्याची सखोल चौकशी केली गेली. चौकशी दरम्यान त्याने हत्या केल्याचं कबुल केलं. रविवारी सकाळी ही घटना घडल्याचं पोलिसांनी माहिती दिली.


आरोपी विक्रम अटवाल (वय 35) याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली असून, आरोपीही पवईचा रहिवासी आहे. त्याची पत्नीही इमारतीतील कचरा उचलण्याचे काम करते. तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी सोसायटीतील सर्व सीसीटीव्ही गोळा केले आणि आरोपी रक्तबंबाळ होऊन पळत असलेल्या ठिकाणाचीही तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तांत्रिक शैलीत त्याची माहिती जाणून घेत त्याचे लोकेशन ट्रेस करून त्याला सहज पकडले.


या प्रकरणात चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली किंवा त्या महिलावर काही अत्याचार झाल्या का याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलीचा मृतदेह हा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवलेला आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतरच नक्की कळेल की नेमकं या महिलेबरोबर काही अत्याचार झाला होता की नाही. त्याचबरोबर या मुलीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार आहे. 


संबंधित बातमी :