Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हे आरोपी भारतीय नौदल (Navy) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (CISF) जवान आहेत. मुंबईतील कफ परेडमध्ये ही मारहाणीची घटना घडली होती. हे चारही आरोपी मुंबईत फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसाला मारहाण केली.
मुंबईत सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कफ परेडमधील रस्त्यावर असलेल्या अशाच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी कफ परेडमध्ये फिरण्यासाठी आले होते. आरोपींनी दुपारचे जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली. टॅक्सीने काही अंतर कापल्यानंतर एका आरोपीने टॅक्सीतच सिगारेट पेटवली. याला टॅक्सी चालकाने विरोध केला. मात्र, आरोपींनी टॅक्सी चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सिगारेटच्या मुद्यावरून टॅक्सी चालक आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या घटनेची माहिती मिळताच एक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पोलिसाच्या मध्यस्थीने संतापलेल्या आरोपींनी उलट पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण केली. पोलिसांनी या मारहाणीनंतर चौघांना अटक केली.
मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आरोपी सुरक्षा दलात कार्यरत आहेत. दोन आरोपी हे भारतीय नौदलाचे आणि दोन आरोपी हे सीआयएसएफचे जवान असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलात असलेल्या जवानांनी थेट पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबादमध्ये पोलिसाला मारहाण
मागील काही दिवसात राज्यात इतरत्रही पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये मुलींची छेड काढणाऱ्याला अटकाव करणाऱ्या पोलिसाच्या डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले होते. घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. संदीप ज्योतीराम चव्हाण (32, रा. गांधीनगर), विकी नरसिंह रिडलोन (33, रा. गांधीनगर), हरिष अशोक चौधरी ( रा.बापूनगर) असे या आरोपींची नावे आहेत. बेगमपुरा पोलीसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर सचिन मधुकर म्हस्के (वय 32 वर्षे, रा. पेठेनगर निसर्ग कॉलनी) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: