Mumbai Crime : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून (BMC Election) उमेदवारी देण्याचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात (V.P. Police Station Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आहे. 


येत्या दोन-तीन महिन्यात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष ताकदीनिशी उतरणार आहेत. या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. आरोपी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागप्रमुख आहे. आरोपी मनसे विभाग प्रमुखाने एका 42 वर्षीय महिलेला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकिट देण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या बहाण्याने आरोपीने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. आरोपीने सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या दरम्यानच्या काळात बलात्कार केला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 500 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


आरोपी हा गिरगावमध्येच वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. मनसे पदाधिकाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


मनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण


काही दिवसांपूर्वी मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही मारहाण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे समोर आली. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा उपविभाग प्रमुख विनोद अरगिले होता. ही घटना समोर आल्यानंतर मनसेने अरगिलेवर कारवाई करत त्याला पक्षातून निलंबित केले. 


गणपतीच्या मंडपासाठी बांबू उभारले जात होते. महिलेनं मेडिकल शॉपच्या समोर बांबू लावण्यास विरोध केला. त्यानंतर संबंधित महिलेच्या मेडिकल शॉपपासून काही अंतरावर हे बांबू उभारले जात होते. पण त्यानंतर महिलेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे अरगिले यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: