मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील (Sheena Bora Murder Case) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukerjea) परदेशी जाण्याकरता दिलेल्या परवानगीला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला उच्च न्यायालयाने 29 जुलैपर्यंत स्थगिती दिली. इंद्राणीला परदेशात जाण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


इंद्राणीवर मुखर्जीवर एका गंभीर प्रकरणात खटला सुरू असून तिच्यावर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. तिला परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास ती पळून जाण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सीबीआयनं हायकोर्टासमोर केला.  


नियमित कोर्ट उपलब्ध नसल्यानं न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे या प्रकरणाची तातडीची सुनावणी घेण्यात आली. 29 जुलैला न्यायमूर्ती चांडक यांच्यापुढे नियमित सुनावणी होणार आहे. 


मुंबई सत्र विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला पुढील तीन महिन्यांमध्ये 10 दिवसांसाठी एकदा युरोप (स्पेन आणि युनायटेड किंगडम) प्रवास करण्याची सशर्त परवानगी दिली होती. मात्र हा आदेश बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करत तो आदेश रद्द करण्याची मागणी करत सीबीआयने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 


What Is Sheena Bora Murder Case : काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण? 


शीना बोरा (वय 24) हिची एप्रिल 2012 साली हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शीनाची आई इंद्राजी मुखर्जी या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अनेक महिने ते तुरुंगात होती. मात्र, सध्या इंद्राणी मुखर्जीला जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे.


इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आल्याचा आरोप आहे. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले होते. 


इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरातील गागोदे गाव गाठल्याचं सांगण्यात येतंय. या गावाच्या परिसरात शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.


ही बातमी वाचा: