Mumbai Crime : महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई (Mumbai) शहर पुन्हा एकदा डागाळलं आहे. मुंबईतील लोअर परेल (Lower Parel) परिसरात एका 15 वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीला तिचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, जिथे सहाही जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील तीन आरोपी अल्पवयीन (Juvenile) असल्याचं समजतं. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


या प्रकरणात अल्पवयीन आरोपींपैकी एक जण हा संबंधित मुलीच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे. 23 डिसेंबर रोजी तो मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलीस करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुंबई पोलिसांच्या वतीने सांगितण्यात आलं.


तीन अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी


एन एम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींपैकी तीन आरोपी प्रौढ आहेत. या आरोपींनी याआधीही अशाप्रकारचं कृत्य केलं आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत. शिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी (Dongri) भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.


मुंबईत याच महिन्यात महिलेवर गँगरेप


मुंबईतून याच महिन्यात एका महिलेसोबत सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. तीन नराधमांनी अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडत एका 42 वर्षीय महिलेवर अत्याचार केले. या तिघांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके दिले.


VIDEO : Mumbai Rape Case : मुंबईतील लोअर परेलमध्ये धक्कादायक घटना, 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार