मुंबई: राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबई उपनगर विभागात मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख 27 हजार रुपयांची औषधं जप्त केली आहेत. बोरिवलीतील भगवती रुग्णालय या ठिकाणी बॉडी बिल्डिंग आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठीच्या या गोळ्या अवैध पद्धतीने विकल्या जात असल्याचं उघड झालं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. 


अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयातील गुप्तवार्ता विभागास मुंबईत शरीर सौष्ठवसाठी स्टिराॉईड इंजेक्शन आणि इतर औषधांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर प्रशासनाच्या गुप्तवार्ता व बृहन्मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी  24 जानेवारी रोजी भगवती रुग्णालय, बोरीवली या ठिकाणाजवळ स्थानिक पोलिसांची  मदत घेऊन सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून त्यांनी स्टिरॉईड आणि लैंगिक क्षमता वाढवण्याच्या गोळ्या विकणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडलं. 


या व्यक्तीकडे चौकशी केली असता ही अवैध औषधे कोशेर फार्मास्युटिकल्स नावाच्या फर्ममधून पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले. अन्न व औषध विभागाने बोरिवली येथील आनंद अपार्टमेंट एसव्ही रोड येथे असलेल्या या फर्मवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे जप्त केली. या बेकायदेशीरपणे विकल्या जाणाऱ्या या औषधांमध्ये टेस्टोस्टेरॉन, ऑक्सॅन्ड्रोलोन,Stanozolol, Estradiol, Mesterolone, Boldenone, Nandrolone, Adenosine मोनो फॉस्फेट इ. आणि लिं वर्धक औषधे- सिल्डेनाफिल आणि टाडालाफिल गोळ्यांचा समावेश आहे. या फॉर्ममध्ये ही औषधे ठेवण्याचा व विक्री करण्याचा परवानाही नाही. अन्न व औषध विभागाच्या म्हणण्यानुसार ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली जाऊ शकतात.


अन्न व औषध विभागाने जप्त केलेल्या सेक्स पॉवर आणि बॉडी बनवण्याच्या या बेकायदेशीर औषधांची बाजारात किंमत सुमारे 52 लाख आहे. हे रॅकेट किती मोठे आहे आणि ही औषधे बेकायदेशीररीत्या कुठे आणि कुठे विकली जात आहेत, याचाही तपास अन्न व औषध विभागाकडून सुरू आहे.


मालेगावात तरुणांमध्ये कुत्ता गोळीची झिंग


नाशिक शहरासह (Nashik City News) मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. काही दिवसांपूर्वी मालेगाव शहराचे कुत्ता गोळीचे कनेक्शन दोन मोठ्या शहराशी जोडण्यात आले होते. आता पुन्हा मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे पेव फुटले आहे. 

 

नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाया सुरू आहेत. त्याअनुषंगाने मालेगाव शहरात गुंगीकारक औषधी गोळ्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणेतील पोलीस अंमलदारांच्या मदतीने 06 डिसेंबर रोजी मालेगाव शहरातील न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याच्यावर छापा टाकून त्याच्या कब्जातून गुंगीकारक औषधी गोळ्यांच्या 10 हजार 80 रुपयांच्या 280 स्ट्रीपचा मुद्देमाल जप्त केला आहे.