Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai) पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये (Kandivali) गोळीबाराचा (Firing) थरार पाहायला मिळाला. मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी चार तरुणांवर चार राऊंड गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन तरुण जखमी आहेत. जखमी तरुणांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांदिवली पश्चिम लालजी पाडा परिसरात शुक्रवारी (30 सप्टेंबर) रात्री ही घटना घडली.


दहीहंडीच्या भांडणातून गोळीबार
पोलिसांच्या माहितीनुसार, मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चार तरुणांवर अंधाधुंद गोळीबार केला. ज्यात अंकित यादव हा तरुण मृत्युमुखी पडला. तर आणखी तीन जण जखमी झाले. ज्यांनी गोळीबार केला आणि ज्या तरुणांवर गोळ्या झाडल्या होत्या हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. या सगळ्यांमध्ये दहीहंडीच्या वेळी भांडण झालं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे आरोपी आणि मृत तसंच जखमी तरुण हे आजूबाजूच्या परिसरात राहणारे आहेत. दहीहंडीच्या भांडणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असं पोलिसांनी म्हटलं.


या चार तरुणांवर गोळीबार
अंकित यादव या तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला. तर अविनाश दाभोळकर, मनिष गुप्ता आणि प्रकाश नारायण हे तीन तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.


दरम्यान कांदिवली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. कांदिवली पोलीस या घटनेचा पुढील तपस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


झोन 11 च्या पोलीस आयुक्तांनी काय माहिती दिली?
"कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज रात्री 12.15 वाजता गोळीबाराची घटना घडली. दोन जण मोटारसायकलवरुन आले आणि चार तरुणांवर गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तीन जण जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्राथमिक तपासात चार राऊंड गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबारानंतर दुचाकीवरुन आलेले दोन्ही तरुण घटनास्थळावरुन पसार झाले. पुढील तपास सुरु आहे," अशी माहिती झोन 11 चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली.


याआधी मुंबईतील वांद्रे परिसरातही गोळीबाराची घटना घडली होती. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीच्या पाठीत गोळी लागली आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. गोळीबार करुन आरोपी पसार झाला होता.