Sanjay Raut On Bhonga Lousspeaker : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भोंग्यांच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, मला वाटतं लाऊडस्पिकरचा मुद्दा संपलाय. कायद्यानुसार काम केले जाईल. महाराष्ट्रात आज शांतता आहे, कुठंही भांडण नाही, सगळं ठिक आहे. माहौल बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील जनतेनं त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे. लाऊडस्पिकरबाबत संपूर्ण देशाकरता एक धोरण तयार झालं पाहिजे, ते सरकारनं करावं, असं ते म्हणाले. 


राऊत म्हणाले की, लाऊडस्पिरच्या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदु समाज आहे. हिंदु समाजात फुट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.  भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही. भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला, असंही ते म्हणाले.  महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नव्हता. फक्त हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी तो काढला गेला. पण हा मुद्दा उठलाच नाही. कोर्टाच्या निर्णयानुसारच राज्यात काम होत आहे, असंही राऊत म्हणाले.


राऊत म्हणाले की, या आंदोलनाचा सर्वाधिक फटका आज हिंदूंनाच बसला आहे. भजन-किर्तन करणाऱ्यांना धक्का बसला. या भूमिकेवर सर्वाधिक नाराज हिंदू समाज आहे. हिंदू समाजात गट निर्माण करण्याचा कट होता. पण तसं होऊ शकलं नाही. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 


महागाईवरुन केंद्रावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, देशात महागाई इतकी वाढलीय की त्यावर कुणी केंद्रातला नेता बोलत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण इथं देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का? भोंग्यांवर कसले बोलता. महागाईवर बोला. भोंग्यांवर बोलणं तुमचं कर्तव्य नाही, महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.