कल्याण  : जिममधील फर्निचरचे काम वेळेत काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या जिम मालकाने ठेकेदारासह त्याच्या तिन्ही कामगारांना जिममध्ये तीन दिवस कोंडून ठेवत दिवाळी आधी काम पूर्ण करा नाही तर तुझ्या किडन्या विकून पैसे वसूल करेन अशी धमकी दिली होती. घाबरलेल्या तिन्ही कामगारांनी तेथून बाहेर पळ काढला. मात्र तो ठेकेदार त्याच ठिकाणी काम करत होता. 22 ऑक्टोबर रोजी घाबरलेल्या ठेकेदाराने याच जिममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. 


याप्रकरणी सदर ठेकेदार पुनमाराम चौधरी याच्या नातेवाईकांनी जिम मालकाने केलेली मारहाण व काम पूर्ण करण्यासाठी दिलेली धमकी यातूनच पुनमाराम याने आत्महत्या केली. जिम मालक वैभव परब हाच पुनमाराम याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुनमाराम यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत जिम मालक वैभव परब विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे


कल्याण पुर्वेकडील तिसगाव नाक्यावरील फिटनेस एम्पायर जिममधील फर्निचरचे काम करण्यासाठी जिमचा मालक वैभव परब याने पुनमाराम चौधरी याला काँट्रॅक्ट दिले होते. मात्र दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काम पूर्ण न झाल्याने वैभव संतापला होता. त्याने 18 तारखेला  त्या ठिकाणी काम करण्यास गेलेल्या पुनमारामच्या रमेश, गोगाराम आणि चोलाराम या तिन्ही कामगारांना त्याने जिममध्ये कोंडले. 19  ऑक्टोबरला पुनमाराम फर्निचरचे उरलेले सामान घेऊन परतताच त्यालाही या तीन कामगाराबरोबर वैभव याने जिममध्ये कोंडून घालत बेदम मारहाण करत काम पूर्ण न केल्यास दिलेले पैसे परत कर अन्यथा तुझ्या किडन्या विकून पैसे वसूल करेन अशी धमकी दिली. 


यामुळे घाबरलेल्या तिन्ही कामगारांनी बाहेर पळ काढला .मात्र पुनमाराम स्वत: जिम मध्ये काम करत थांबला होता. मात्र 22 ऑक्टोबर रोजी पुनमाराम याने जिममधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. वैभव याने केलेल्या मारहाणीमुळे आणि दिलेल्या त्रासामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात वैभव विरोधात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी वैभव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे.