Mumbai Crime News: अल्पवयीन मूकबधिर मुलीचं चुंबन घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका डिलिव्हरी बॉयला लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पोक्सो) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयानं (Pocso Court) जामीन मंजूर केला आहे. ही घटना घडली तेव्हा, आरोपी घटनास्थळी उपस्थितच नसल्याचं नामांकित फूड डिलिव्हरी अॅपच्या ट्रॅकिंग सिस्टिमच्या (जीपीएस) माध्यमातून स्पष्ट होत असल्याचा मुद्दा ग्राह्य धरत असल्याचं न्यायाधीश कल्पना पाटील यांनी आपल्या आदेशांत नमूद केलं आहे.


आरोपीनं विशेष पोक्सो न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आपण निर्दोष असून पीडितेचं कुटुंबीय आणि आपल्या कुटुंबीयांचे वारंवार खटके उडत असतात आणि त्याचाच बदला घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी आपल्याला या खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा आरोपीने केला.  घटनेच्या दिवशी घटनास्थळी आपण उपस्थितच नव्हतो. त्यावेळी आपण एका अॅपसाठी खाद्यपदार्थ वितरीत करत होतो. आपण कोणतंही वाईट, चुकीचं कृत्य केलेलं नाही. आपण कुटुंबातील एकमेव कमावते असल्यानं तुरुंगात राहिल्यास आपले पुढील आयुष्यच उद्ध्वस्त होईल. आपल्याला जामीन मिळाल्यास पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करू, आपली कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्यावतीने करण्यात आला होता. 


कोर्टाने काय म्हटले?


पोलिसांनी सादर केलेल्या नोंदी, पुरावे आणि इतर कागदपत्रांवरून असं दिसून येते की, सायंकाळी 7:39 ते रात्री 2:45 पर्यंत अर्जदार सतत फूड डिलिव्हरीचं काम करत होता. तक्रारीनुसार रात्री 9 वाजता ही पीडिता आपल्या आईला आरोपीच्या घरी घेऊन गेली, आणि त्यानंतर काही वेळानं आरोपी तिथं आला. त्यावेळी पीडितेनं आरोपीच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. त्यामुळे तक्रारदाराचे हे आरोप आरोपीनं जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जात विरोधाभास असल्याचं दिसून येत असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. 


पोलिसांनी तपासासंबंधित कागदपत्र आणि पोलिसांचा अहवालही सादर केलेला नाही. ही घटना घडली त्याठिकाणी आरोपी उपस्थितच नव्हता आणि घटना घडली तेव्हा तो अन्नपदार्थ वितरीत करत होता, हे स्पष्ट पुरव्यांवरून स्पष्ट होत असल्याचं नमूद केलं आहे. आरोपीनं तपासांत सहकार्य करावं, अन्य साक्षीदारांशी संपर्क साधू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटीशर्तीसह आरोपीला 15 हजारांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.


काय आहे प्रकरण 


30 ऑक्टोबर 2022 रोजी पीडितेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री 9 वाजता आई परत आली तेव्हा या मूकबधिर पीडितेनं ती किराणा दुकानातून परतत असताना गल्लीत कोणीतरी तिचं चुंबन घेतल्याचं सांकेतिक भाषेतून सांगितलं. त्याव्यक्तीबाबत विचारणा केली असता पीडितेनं आईला आरोपीच्या घरी नेलं. त्यानंतर, डिलिव्हरीचं काम करणारा तो आरोपी घरी परत आला तेव्हा पीडितेनं त्याच्याकडे बोट दाखवत यानंत जबरदस्तीनं चुंबन घेतल्याचं सांकेतिक भाषेत आईला सांगितलं. त्यावर पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात अर्जदारावर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम 3 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.



POCSO Court : विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयला कोर्टाकडून जामीन मंजूर