Mira Road Crime Case: मृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या बुधवारी रात्री मिरारोडमध्ये (Mira Road Crime) घडली. मिरारोडच्या घटनेचा खुलासा झाल्यानंतर अवघा देश हादरला. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे सत्र न्यायालयानं आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मनोजनं पोलिसांना सांगितलं की, त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या त्यानं केलीच नाही, तर सरस्वतीनं आत्महत्या केली होती. त्यानंतर घाबरल्यामुळे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी असं पाऊल उचलल्याचं आरोपी मनोजनं सांगितलं. तसेच मृत महिला आपल्याला मामा म्हणत होती असा दावाही आरोपीने केला आहे.
आरोपी मनोज HIV पॉझिटिव्ह, पोलीस म्हणतात...
मनोजनं तो HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती पोलिसांना दिली. यामुळेच त्याच्यात आणि सरस्वतीमध्ये तणाव होता, असंही तो म्हणाला. परंतु, पोलिसांचं म्हणणं आहे की, मनोज हत्येच्या आरोपांखाली अटकेत आहे. तो सातत्यानं वेगवेगळे दावे करून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहे. मेडिकल रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
आरोपी मनोजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची त्यानं केलीच नाही. 3 जून रोजी सरस्वतीनं आत्महत्या केली होती. त्यानंतर मनोज घाबरला, पोलीस त्यालाच सरस्वतीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरतील, असं त्याला वाटलं. त्यामुळेच त्यानं सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं आधी मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यानंतर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, असंही आरोपी मनोजनं पोलिसांना सांगितलं. तसेच, सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार होता. तसेच, त्यानं जे केलं त्याबाबत त्याला जरासाही पश्चाताप नाही, असंही आरोपी मनोजनं ठामपणे सांगितल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
मनोज हत्येचा आरोपी, दिशाभूल करतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सखोल तपास होणार; पोलिसांची माहिती
आरोपी मनोज सानेनं पोलिसांना सांगितलं की, तो HIV पॉझिटिव्ह आहे, त्यामुळेच त्याच्यात आणि सरस्वतीच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. आरोपी मनोजच्या चौकशीतून समोर आलेल्या काही गोष्टींनंतर मिरारोड पोलिसांनीही याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, मनोजनं चौकशीत अनेक दावे केले आहेत. तो सध्या हत्येच्या आरोपांखाली अटकेत आहे, तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, तो चौकशीत सहकार्यही करत नाही. आरोपी सतत आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला जाणार आहे. तसेच, मनोजनं केलेल्या सर्व दाव्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. मनोजचा मेडिकल रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच याप्रकरणातील अनेक गोष्टी स्पष्ट होतील असंही पोलीस म्हणाले आहेत.
मिरारोड मर्डर मिस्ट्री नेमकी काय?
मिरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची विकृत मनोवृत्तीची घटना उघडकीस आली. 56 वर्षांचा मनोज साने असं आरोपीचं नाव आहे तर मृत महिलेचं नाव सरस्वती वैद्य असून ती 32 वर्षांची होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे करून मनोज साने ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. त्यानंतर हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो बाईकवरून जायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केली. मीरा भाईंदर उड्डाणपुलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटीतील ही घटना आहे. पोलिसांनी सानेला अटक केलीय. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपी सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mira Road Crime : त्यानं आधी तुकडे केले, मग कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरला बारीक केले; देश हादरवणारी क्रूर, भयावह 'मिरारोड मर्डर मिस्ट्री'
- हॉलमध्ये कटर मशीन, बेडरूममध्ये काळं पॉलिथीन; मिरारोडच्या घरात काय पाहिलं? प्रत्यक्षदर्शीचा हादरवणारा अनुभव
- Mira Road Crime: इतकं निर्दयी कोणी कसं होऊ शकतं? हत्या करून लिव्ह इन पार्टनरचे तुकडे कुकरमध्ये अन् मिक्सरमध्ये...