Mumbai Crime : मुंबईत (Mumbai) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत पूर्ववैमनस्यातून चार अल्पवयीन (Juvenile) मुलांनी आपल्या एका मित्राची चाकून भोसकून हत्या (Murder) केली. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मृत मुलगा देखील अल्पवयीन असून तो 16 वर्षांचा होता. ज्या चार अल्पवयीन मुलांनी हत्या केली, त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पूर्ववैमनस्यातून कोयता आणि चाकूने भोसकून मुलाची हत्या


ही घटना 4 जानेवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. ही सर्व अल्पवयीन मुलं नशा करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. त्याच वादातून परवा संध्याकाळी चार जणांनी 16 वर्षीय मुलाची हत्या करण्याचं ठरवलं. सर्व जण एकत्र बसलेले असताना चार मुलांनी कोयता आणि चाकूच्या साहाय्याने मित्राची हत्या केली. आरोपी अल्पवयीन मुलांनी मृत मुलाच्या शरीरावर 14 ठिकाणी वार केले, ज्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. डोक्याला, मानेला आणि हाताला गंभीर जखमा होऊन अतिरक्तस्राव झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये समोर आल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली.  


अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा, बालसुधारगृहात रवानगी


या प्रकरणी मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 302 आणि 34 अंतर्गत चारही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं असून पोलीस तपास करत आहेत. 


मृत मुलगा आजोबांसोबत मानखुर्दमध्ये राहत होता


दरम्यान मृत मुलाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून त्याची आई दुबईमध्ये काम करते आणि वडील मुंबईत राहतात. मृत मुलगा मानखुर्दमध्ये आपल्या आजोंबासोबत राहत होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. इथेच त्याला नशा करण्याची सवय लागली होती. 


मानखुर्द गोवंडी परिसर नशेच्या विळख्यात


मानखुर्द-गोवंडी परिसराभोवती अंमली पदार्थांचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याचं समोर आलं आहे. तरुण आणि त्यांचं अनुकरण करणारी पौगंडावस्थेतील मुलंदेखील या पाशात अडकत आहेत. गांजा, एमडी, बटन, कोरेक्स तसंच व्हाईटनर इत्यादींची छुप्या पद्धतीने खरेदी-विक्री परिसरात होते. गोवंडी हे अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे केंद्र बनलं आहे. गोवंडीच्या क्षेपणभूमीसह खाडीचा परिसर, शिवाजी नगर आगारामागील जागा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा परिसर तसंच घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाचं क्षेपणभूमीकडील टोक तर मानखुर्दमध्ये मंडाळा झोपडपट्टी परिसर, ट्रॉम्बे चिता कॅम्प इथला खाडीलगतचा परिसर, स्मशानभूमीमध्ये नशेखोरांची मैफिल जमते.