Mumbai Crime: मुंबईतील एका प्रथितयश वकिलाला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून तरुणीने पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीने मॉर्फ केलेले काही फोटो दाखवून या वकिलाला (Lawyer) धमकावले. यानंतर त्याच्याकडून जवळपास दीड कोटी रुपये उकळले. अखेर डोक्यावरुन पाणी गेल्यानंतर या वकिलाने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित वकील हा केंद्र सरकारसाठी अत्यंत उच्च पदावर काम करतो. त्याने जी-20 परिषदेसह (G 20 summit) आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत वकिलाला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आणखी काय कारवाई होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील हा वकील आणि त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीची ओळख मित्रांमार्फत झाली होती. गेल्यावर्षी ही तरुणी वकिलाच्या मित्रांसोबत त्याच्या घरी आली होती. त्यानंतर हे दोघे इन्स्टाग्रामवरुन एकमेकांशी चॅटिंग करु लागले. काही काळानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलायला सुरुवात केली. ही ओळख नंतर वाढत गेली. हे दोघे अधुनमधून भेटतही होते. दोघांमधील मैत्री घट्ट झाल्यानंतर या तरुणीने वेगवेगळी कारणे सांगून वकिलाकडून पैसे मागायला सुरुवात केली. त्यानेही तरुणीला बऱ्याचदा पैसे दिले. ही रक्कम जवळपास 20 ते 30 लाखांच्या घरात होती. मात्र, नंतर या वकिलाने पैसे परत मागितले तेव्हा तरुणीने नकार दिला. एवढेच नव्हे तर दोघांच्या भेटीवेळचे खासगी फोटो मॉर्फ करुन ते व्हायरल करण्याची आणि त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.
याशिवाय, मध्यंतरी या तरुणीने वकिलाच्या घरी येऊन त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तू माझ्यासोबत फिरायला चल, असा हट्टही या तरुणीने धरला होता. तसेच एकदा त्याच्या घरी येऊन तरुणीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा या वकिलाने, मी विवाहित आहे, मला लहान मुलगी आहे, असेही या तरुणाला सांगितले. तरीही ही तरुणी वकिलाशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत राहिली. त्यानंतर तरुणीने या वकिलाला ब्लॅकमेल करुन जवळपास दीड कोटी रुपये उकळले. गोरेगाव पोलीस ठाण्यात या तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आणखी वाचा