मुंबई : नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना 70 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळाले आहे. यामध्ये 14 हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर शहरांमध्ये त्यांचे जाळे पसरले आहे. वस्तू किंवा माल न पुरवता 385 कोटींहून अधिक रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या होत्या.
मुंबई सीजीएसटी विभागाच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत दोन व्यावसायिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांपैकी एक मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचा संचालक आहे. तर दुसरा मेसर्स श्री बिटुमॅक्स ट्रेडिंगचा मालक आहे.
बिटुमेन, अॅस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड इत्यादींच्या व्यापारासाठी दोन्ही संस्था जीएसटी बरोबर नोंदणीकृत आहेत. सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा न मिळवता अनुक्रमे 20.75 कोटी रुपये आणि 11.31 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणूक करून मिळवले आहे. या दोन्ही कंपन्या अस्तित्वात नसलेल्या संस्थांकडून बनावट आयटीसी मिळवत होत्या आणि ते या नेटवर्कमधील इतर कंपन्यांना देत होत्या. इतर 12 कंपन्यांनी 38 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतला आहे
संचालक आणि मालक दोघांनाही सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. वाशी इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे गेले चार महिने सुरु असलेल्या या मोहिमेदरम्यान 500 हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात 40 जणांना अटक करण्यात आली आहे. 4550 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. 600 कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.
अलीकडेच 3.01.2022 रोजी, ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी एका पिता-पुत्र जोडीला 22 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी नेटवर्क चालवल्याबद्दल अटक केली होती. 5.1.2022 रोजी, मुंबई सेंट्रल आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी मेसर्स नूर टिंबरचा मालक असलेल्या लाकूड व्यापाऱ्याला अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून 5.47 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी मिळवल्याबद्दल अटक केली होती.
सीजीएसटी मुंबई विभाग आणि क्रिप्टो चलन एक्सचेंज वझीरएक्सने करचुकवेगिरी केल्याचे देखील आढळून आले आणि तपासादरम्यान 49.2 कोटी रुपये जीएसटी वसूल करण्यात आला. येत्या काळात फसवणूक करणार्याविरुद्ध तसेच करचुकवेगिरी विरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे मुंबई विभागाच्या सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग यांनी म्हटले आहे.