मुंबई: मुंबईच्या गोराई परिसरात रविवारी गोणीत भरलेला एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात (Mumbai Dead Body) आले होते. येथील बाबरपाडा ते पिक्सी रिसॉर्टच्या रस्त्यालगत असणाऱ्या झुडुपांमध्ये ही गोणी टाकून देण्यात आली होती. मृतदेह कुजल्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी शोध घेतला असता गोणीतील मृतदेह आढळून आला. यानंतर गोराई पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे. (Mumbai Crime news)
पोलिसांनी गोणीतून मृतदेह बाहेर काढला तेव्हा डोके, हात-पाय, धड असे वेगवेगळे 7 अवयव डब्ब्यांमध्ये भरल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृत व्यक्तीचा फोटो आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये पाठवून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती पसरल्यानंतर गोराई परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत व्यक्ती कोण होता, त्याचा खून का करण्यात आला, याबद्दल नागरिकांमध्ये बरीच कुजबूज सुरु आहे. त्यामुळे वेगाने तपास करुन मारेकऱ्याला शोधणे, हे पोलिसांसमोरील आव्हान आहे.
गोराईतील गोणीत भरलेल्या मृतदेहाबाबत महत्त्वाची माहिती समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गोणीत मृतदेहाचे सात तुकडे मिळाले. मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरण्यात आले होते. हे सगळे तुकडे गोळा करुन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत व्यक्तीचे वय 25 ते 40 च्या आसपास असून त्याने निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. त्याच्या पायात काळ्या रंगाचे बूट होते. मृतदेहाचे हात-पाय कापून प्लॅस्टिकच्या वेगळ्या डब्यात ठेवण्यात आले होते. यापैकी उजव्या हाताच्या मनगटावर विशिष्ट अक्षरे (Tatoo on hand) कोरलेली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. घटनास्थळी सापडलेले फॉरेन्सिक पुरावे आणि या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी याप्रकरणाचे धागेदोरे जुळवायला सुरुवात केली आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तपासाला वेग येऊ शकतो आणि याप्रकरणी उकल होऊ शकते.
आणखी वाचा
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले