मुंबई: प्रेमाच्या आहारी जाऊन किंवा भावनिक होऊन अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात. अलीकडे अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशात मुंबईच्या अंधेरी मरोळ परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीने घरात गळफास घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टी तुलीच्या मित्राला अटक केली आहे. 25 वर्षीय सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. 25 तारखेला सृष्टी आपल्या राहता घरी गळफास लावून आत्महत्या केली.
पायलट सृष्टी तुलीच्या कुटुंबाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, तुली दिल्लीतील तिच्या मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती, त्यानेच तिची हत्या केली आणि ती आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. त्यांनी तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले होते. तिला मांसाहार करण्यापासून रोखल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांना केली आहे.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुली सोमवारी पहाटे अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलिस कॅम्पच्या मागे असलेल्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिक चौकशीत तिचा मित्र पंडित याच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती, असे पोलिसांनी सांगितले. तुलीचा मित्र पंडित देखील पायलटच्या परीक्षेची तयारी करत होता. पण तो परिक्षा पास करू शकला नाही, असेही ते म्हणाले आहेत.
तुली रविवारी काम आटोपून घरी परतली तेव्हा, पंडितशी वारंवार उशिरा येण्या-जाण्यावरून तिचा वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पहाटे एकच्या सुमारास पंडित दिल्लीला रवाना झाला. तुलीने त्याला कॉल केला आणि ती टोकाचे पाऊल उचलणार असल्याचं तिने सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित पुन्हा तिच्या घरी परतला पण दरवाजा आतून बंद होता. त्याने एका की मेकरला कॉल केला, घर उघडले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंडितने तिला तातडीने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले, तेथे तुलीला मृत घोषित करण्यात आले. लवकरच तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, तुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्यांनी पंडितला भारतीय न्याय संहिता कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त) अंतर्गत अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे
त्यांनी पुढे सांगितले आहे.
“पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींसोबतच्या बोलण्याचे विश्लेषण करण्यासाठी लॉक केलेला तुलीचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. आम्ही लवकरच तिच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र, सहकारी आणि रूममेट यांचे जबाब नोंदवू,” पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी झाली होती दिल्लीत भेट
फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (FIR) नुसार, दोन वर्षांपूर्वी कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) साठी प्रशिक्षण घेत असताना दोघांची दिल्लीत भेट झाली होती. प्रशिक्षणादरम्यान तुली दिल्लीत द्वारका येथे राहत होती. प्रशिक्षणानंतर, तिला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि जून 2023 मध्ये ती मुंबईला आली.
महिलेचा काका विवेक कुमार तुली, जे गोरखपूरमध्ये गॅस एजन्सी चालवतात, त्यांनी तिच्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पंडित अनेकदा तिच्याशी गैरवर्तन करायचा. तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायचा. एफआयआरमध्ये लिहण्यात आलं आहे, तुलीने कामानिमित्त पंडितच्या बहिणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम चुकवल्यानंतर त्याने जवळपास 10 दिवस तिच्याशी बोलणे बंद केले होते, असे त्यांनी सांगितले. त्याच्या वागण्याने तिला अनेकदा मानसिक त्रास होत होता, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
"तो तिच्यावर ओरडायचा. एकदा एका पार्टीमध्ये त्याने तिला मांसाहार खाण्यावरून ओरडला होता, तो तिच्या कारचे नुकसान करून तिला रस्त्याच्या मधोमध सोडून द्यायचा. तो तिला खूप त्रास देत असे, पण तुलीचे त्याच्यावर खूप प्रेम होते," विवेक कुमारने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तुलीच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रविवारी काम संपवून घरी पोहोचल्याचे दिसून येते. तिने फोनवर तिच्या आईशीही संवाद साधला, काळजीचं कोणतंही कारण दिसत नाही.
'पंडितने तिच्या खात्यातून पैसे काढले'
विवेक कुमार यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आत्महत्येकडे निर्देश करत असला तरी पंडितने तिला काही औषध दिले आणि तिची हत्या केली असा कुटुंबाचा ठाम संशय आहे. तो तिच्या बँक खात्यातून पैसे काढत असे आणि आम्हाला संशय आहे की तो तिला ब्लॅकमेल करत होता. आम्हाला काही व्यवहार सापडले आहेत. आम्ही लवकरच हे तपशील पोलिसांना देऊ.
तुली ही गोरखपूरमधील पहिली महिला पायलट होती. गोरखपूरमध्ये तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक जमले होते. सृष्टी तुली लष्करी कुटुंबातील होती. तिचे आजोबा नरेंद्रकुमार तुली 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात मरण पावले आणि तिच्या काकांनीही भारतीय सैन्यात काही काळ काम केले आहे.
सृष्टीच्या नातेवाईकांना माहिती मिळतात त्यांनी सृष्टीला सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सृष्टीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत सृष्टीच्या मित्राला दिल्लीमधून अटक केली आहे. अटक केलेल्या तिच्या मित्राचे नाव आदित्य पंडित असं आहे. सृष्टीने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. सध्या पवई पोलिसांकडून अटक केलेल्या तिच्या मित्राला कोर्टात हजर केले असता कोर्टामधून त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सृष्टीने टोकाचं पाऊल का उचललं यामागे तिच्या मित्राचा हात आहे का या सर्व संदर्भात अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.