मुंबई : मुंबईतील 'आयएनएस हमला' वर (INS Hamla) अग्निवीर प्रशिक्षणार्थी (Agniveer Trainee) असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केली आहे. खासगी कारणाने तरुणीने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपर्णा नायर असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सुरू आहे. 


अपर्णा नायर हीने 27 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपर्णा नायर हिची अग्निवीर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली होती. अर्पणा ही नौदलाच्या 'आयएनएस हमला' वर प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती. लॉजिस्टिक विभागात तिची नियुक्ती करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णाचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधांमध्ये दुरावा आला होता. त्यातून आलेल्या तणावातून तिने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपर्णाच्या आत्महत्येची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मुलीची तपासणी करून तिला मृत घोषित केले.  या प्रकरणी मालवणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


अपर्णा ही मूळची केरळमधील आहे. मागील 15 दिवसांपासून ती प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वसतिगृहातील खोलीत अर्पणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.


अग्निपथ योजनेंतर्गत 'अग्नीवीर' सैनिक चार वर्षे सेवा देतात, ज्यामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि साडेतीन वर्षांच्या तैनातीचा समावेश असतो. यानंतर, ते सशस्त्र दलात नोकरीसाठी अर्ज करू शकतात.


'नीट' ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने उचलेले टोकाचे पाऊल


'नीट' (NEET) ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने पीजी हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची (Student Suicide) खळबळजनक घटना समोर आली आहे. अथर्व सत्येंद्र श्रीवास्तव असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून अभ्यासाच्या दडपणातून त्याने हे टोकचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली. मृत अथर्व श्रीवास्तव हे मध्य प्रदेशमधील आहे.