Mumbai Crime News:मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाची त्याच्याच मित्रांनी मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर पुरावा लपवण्यासाठी मृतदेह तलावात फेकून तो बुडाल्याचा बनाव करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी (Police) 14 ते 15 वयोगटातील तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Continues below advertisement

Mumbai Crime News: दादागिरीचा राग अन् मारहाणीतून मृत्यू

मृत मुलाचे नाव सिद्धार्थ अजय लोंढे (वय 14) असे असून तो भांडुप पश्चिमेतील तुळशेटपाडा परिसरात कुटुंबासोबत राहत होता. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजता तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही काहीच माहिती न मिळाल्याने आईने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दरम्यान, प्राथमिक चौकशीत सिद्धार्थ नेहमी मित्रांवर दादागिरी करत असल्याने काही मित्रांनी त्याला धडा शिकवण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्याला विहार तलाव परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली. मारहाणी दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

Mumbai Crime News: मृतदेह तलावात टाकून बनाव

घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी मृतदेह तलावात फेकून तो पाण्यात बुडाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 5 वाजता विहार तलावात एक मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आला.

Mumbai Crime News: आरोपी ताब्यात, शस्त्र जप्त

शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी संशयित मित्रांची चौकशी केली. चौकशीदरम्यान एका मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि आणखी दोन मित्रांचा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून मारहाणीत वापरलेली लाकडी काठी जप्त केली आहे. तिन्ही मुलांना पुढील कारवाईसाठी डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akola Crime: अकोल्यात ठाकरे गटाच्या शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला; अज्ञातांनी कारच्या काचा फोडल्या, आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

धक्कादायक! चुलत्यानेच 13 महिन्याच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले, धाराशिव हादरलं, आरोपीला अटक