Mumbai Crime : मुंबईतील गावदेवी परिसरातील एका घरातून तब्बल 1.98 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. चोरी झालेल्या दागिन्यांपैकी 1.71 कोटी रुपयांचे दागिने गावदेवी पोलिसांनी (Gamdevi Police) परत मिळवले आहेत. या चोरीमध्ये अनेक वर्षे घरात काम करणाऱ्या मोलकरणीचा (Maid) समावेश आहे. शरद संघवी यांच्या घरी ही चोरी झाली. ते NTI लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.


अब्दुल मुनाफ तौफिक शेख, मिलेन सुरेन, हसमुख बागडा, नसरुद्दीन शेख आणि संगीता कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यापैकी अब्दुल मुनाफ तौफिक शेख (वय 38 वर्षे) आणि मिलेन सुरेन (वय 37 वर्षे) हे घरातील नोकर असून हसमुख बागडा, नसरुद्दीन शेख आणि संगीता कांबळे हे तीन दागिने दलाल आहेत ज्यांनी या दोघांना चोरीचे दागिने विकण्यास मदत केली होती.


कपाटातून दागिने गहाळ झाल्याचं समजताच पोलिसात तक्रार 


या प्रकरणी शरद संघवी यांनी 14 एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार त्यांच्या पत्नी निराली या 14 एप्रिल रोजी एका कार्यक्रमाला जात होत्या आणि त्यांना काही दागिने घालायचे होते. त्यासाठी त्या कपाटातून दागिने काढायला गेल्या असता, काही दागिने गहाळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आधी घरातील तीन नोकरांकडे विचारपूस केली. पण याबाबत काहीच माहिती नसल्याचं नोकरांनी सांगितलं. त्यामुळे शरद संघवी यांनी नोकरांना घेऊन गावदेवी पोलीस स्टेशन गाठलं. या प्रकरणात मिलेन सुरेन या मोलकरणीवर संशय होता.


कारमायकल रोडवर शरद संघवी यांचं घर आहे. त्यांच्या घरी मिलेन सुरेन, बबिता मोरे आणि रामनारायण चौरसिया हे घरात काम करुन तिथेच राहत होते. संघवी यांच्या पत्नीकडे हिरेजडीत आणि सोन्याचे दागिने, हिरेजडीत घड्याळ आणि अन्य किंमती वस्तू होत्या. हा सर्व ऐवज त्या बेडरुममधील कपाटातल्या लॉकरमध्ये ठेवून चावी कपाटात ठेवत होत्या 


घरातील मोलकरणीला बेड्या आणि चोरी उघड


चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करुन तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. चौकशीत मिलेन सुरेन या मोलकरणीनेच चोरी केल्याचं समोर आलं आणि तिला ताब्यात घेतलं. तिला अटक करुन चौकशी केली असता तिने याबाबत इत्यंभूत माहिती सांगितलं आणि त्यावरुन यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान मिलेनने दिलेल्या माहितीनुसार, "काही वर्षांपूर्वी शरद संघवी यांनी घरात कार्यक्रम ठेवला होता. मूळ बार टेन्डरचं काम करणारा अब्दुल त्या कार्यक्रमात होता. त्यावेळी अब्दुल आणि मिलेनची ओळख झाली. मग ओळखीचं रुपांतर घट्ट मैत्रीत झालं. यावर्षी जानेवारी महिन्यात त्या दोघांनी लग्न केलं आणि ते माहिममध्ये राहत होते.


फेब्रुवारीपासून दररोज एक एक दागिन्याची चोरी


मालकिणीकडे सोन्याचे आणि हिरेजडीत दागिने, हिरेजडीत घड्याळ असल्याचे मिलेनने अब्दुलला सांगितलं. त्यानुसार दोघांनी काही महिन्यांपूर्वी चोरीचा कट रचला आणि संधी साधून दागिन्यांवर डल्ला मारला होता. मिलेन ही अब्दुलला घरातील प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायची असं पोलीस तपासात समजलं. मिलेन दररोज घरातील एक एक दागिना चोरायची आणि अब्दुलकडे द्यायची. तिने फेब्रुवारीपासून घरातील दागिने चोरण्यास सुरुवात केली. हा चोरीचा एक नियोजित कट होता, असं पोलिसांनी सांगितलं.


एक कोटी 71 लाख रुपये किंमतीचा ऐवज परत मिळवला


यानंतर गावदेवी पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक शशिकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन अब्दुलचा शोध घेण्यात आला. अब्दुल परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समजताच पोलिसांनी त्याला जोगेश्वरी इथून ताब्यात घेतलं. चोरलेले दागिने मिलेन आणि अब्दुलने इतर तीन आरोपी हसमुख बगडा, नसरुद्दीन शेख आणि संगीता कांबळे यांच्यामार्फत विकल्याचं चौकशीतून उघड झालं होतं. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना पकडून जवळपास एक कोटी 71 लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.