मुंबई: मालमत्तेच्या हव्यासापोटी आई आणि मुलाचं अपहरण करुन मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेंबूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून त्यामधील महिलेचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रोहिणी वसंत कांबळे (88 वर्षे) आणि त्यांचा मुलगा विशाल वसंत कांबळे (44 वर्ष) हे चेंबूर परिसरातून 5 एप्रिल रोजी पासून बेपत्ता असल्याची तकार देण्यात आली होती. चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये ही ही तक्रार नोंद करण्यात आली होती. 


सदरची तक्रार 15 दिवसांनी उशीरा प्राप्त झाली आणि याबाबत कोणतीही माहिती मिळवता येत नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा अत्यंत गोपनीय तपास करण्यास सुरवात केली. पोलीस पथकाने एकाचवेळी वडाळा, मुंबई आणि पवई या परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत समजले की, आरोपींनी त्या दोन व्यक्तींना मालमत्ता घरेदी-विक्रीचे कारण सांगून बैठकीसाठी पनवेल या ठिकाणी बोलावले. तेथून साथीदारांच्या मदतीने दोघांचे 05 एप्रिल रोजी करून अपहरण केले. त्यामधील विशाल वसंत कांबळे याला जीवे ठार मारण्यात आले. तसेच रोहिणी वसंत कांबळे या महिलेस एका इमारतीत कोंडून ठेवण्यात आलं. तिच्याकडून प्रॉपटी नावावर करून घेण्यासाठी असं केल्याचं आरोपींनी कबुल केलं.


सदर महिलेच्या जीवितास धोका असल्याने आणि त्यांची सुरक्षित सुटका होणे गरजेचे असल्याने पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ पोहचले. त्या ठिकाणी संबंधित महिलेवर पाळत ठेवण्याकरता दोन इसम असल्याचे आढळून आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि त्या महिलेचा सुटका करण्यात आली. प्रथमदर्शनी हरवलेल्या महिलेस गुंगीचं औषध दिल्याचं लक्षात आल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सदर महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. 


पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समजले आहे की बेपत्ता विशाल कांबळे या व्यक्तीची पनवेलमधील एका व्हिलामध्ये हत्या करण्यात आली आणि नंतर त्याचा मृतदेह वरोडा-अहमदाबाद महामार्गाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला. पोलिसांना अद्याप मृतदेहाचा शोध लागलेला नाही. ही घटना 4 एप्रिल ते 2 मे 2023 या एक महिन्याच्या कालावधीत घडली.


चेंबूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 364, 346, 347, 328, 201 आणि 120 (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असून त्यांची नावे मुनीर अमिन पठाण (वय 41), रोहित अनिल अदमाने उर्फ मुसा पारकर (वय 40), राजू बाबू दरवेश, (वय 40), ज्योती सुरेश वाघमारे (वय 33), प्रणव प्रदिप रामटेके (वय २५) अशी आहेत.


पुढील तपास चेंबूर पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा यांच्याकडून केला जात आहे.