मुंबई : मुंबई परिसरातील बँकांमध्ये पैसे काढायला गेलेल्या लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपीला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. बँकेमधून पैसे काढणाऱ्यांना या टोळीतील लोक आपल्या बोलण्यामध्ये फसवून, काढलेल्या पैशांमध्ये काही नकली नोटा असल्याच सांगायचे आणि पैसे पुन्हा मोजून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि हातचलाखी करुन त्यातील पैसे काढून ते तिथून पसार व्हायचे.
या टोळीतील मास्टर माईंड...
लकीर पपली हुसैन (वय 38) हा या टोळीचा मास्टर माईंड होता. 3 एप्रिल रोजी मुंबईच्या बोरी मोहल्ला येथील बँक ऑफ इंडियामध्ये फरीदा इलेक्ट्रिकवाला (वय 53) या जेव्हा पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी लकीर हुसेनसुद्धा त्यांच्या जवळपास फिरकत होता. फरीदा इलेक्ट्रिकवाला यांनी जेव्हा पैसे काढले, तेव्हा लकीर पपली हुसेन त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना तुमच्या पैशांमध्ये नकली नोटा आल्याच सांगत त्या पुन्हा मोजून देतो असं सांगून बँकेतून काढलेले 1 लाख 47 हजार रुपये घेतले आणि हात चालाखीने त्यातील 50 हजार रुपये लंपास केले.
फरीदा इलेक्ट्रिकवाला जेव्हा यांना ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेच जेजे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि गुन्हा नोंदवला पोलिसांसोबत मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षानेसुद्धा समांतर तपास सुरु केला आणि या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर मालमत्ता कक्षाच्या तपासाला यश आलं आणि त्यांनी लकीर हुसेन याला ठाण्यातील आंबिवली परिसरातून अटक केली. लकीर हुसेन याच्यावर अशा प्रकारचे मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. लकीर हुसेन हा विशेष करून वृद्ध लोक बघून आपला प्लान आखायचा. आपल्या गोड बोलण्यामध्ये लोकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्यामध्ये लकीर हुसेन पारंगत होता. आणि म्हणून लकीर हुसेन कधी पोलिसांच्या हाती लवकर लागला नाही आणि मुंबईच्या विविध बँकांमध्ये अशाच प्रकारे लोकांची फसवणूक करायचा. पण त्याचा हा प्लॅन जास्त दिवस चालला नाही आणि शेवटी तो पोलिसांच्या तावडीत सापडला. या प्रकरणानंतर पोलिसांकडून सुद्धा लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की, अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे.
सदरची कामगिरी मिलिंद भारंबे पोलिस सहआयुक्त (गुन्हे), वीरेश प्रभू अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे),प्रकाश जाधव पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण), यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम, पोलीस उपनिरीक्षक गादेकर, सहायक फौजदार पासी, पोलीस नाइक विनोद पद्मन संतोष आवटे यांच्या द्वारे बजावण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :