मुंबई:  दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मुंबईतून (Mumbai Crime) गावी किंवा फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चव्हाण आणि काळे टोळीतील दोन जणांना अटक करण्यात मुंबईच्या बोरिवली (Mumbai Borivali) पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीतील तीन जण फरार झाले असून या तिघांचा पोलिसांकडून (Borivali Police) शोध सुरूच आहे. गुन्हा करण्यासाठी आणलेली हत्यारे व शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना अटक


 काही इसम दरोडा टाकण्यासाठी बोरिवली येथील हुंडाई शोरूम, बडोदा बँकेच्या समोर, दत्तपाडा रोड येथे एकत्र येणार असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी पंच आणि तपासाची टीम तयार करून त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी बडोदा बँकेच्यासमोर अंधारामध्ये काही संशयीत हे एका ऑटो रिक्षाने आले. बडोदा बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांच्या हालाचाली संशयास्पद दिसून लागल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला.  दोन आरोपींना अटक केली तर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. फरार आरोपींचा कस्तुरबा मार्ग पोलीस तपास करत आहेत.


करण महादेव चव्हाण (वय 21 ) प्रकाश शामा चव्हाण (वय 22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  या दोघांकडून पोलिसांनी लोखंडी तार कटर, स्क्रू ड्रायव्हर आणि गॅस कटर, पक्कड अशी हत्यारे जप्त केली आहेत. तर गोपी विजय चव्हाण (वय 21), गोविंद काळे (वय 45), राहुल रमेश काळे (वय 22) वर्षे अशी फरार झालेल्या आरोपींची नावे असून सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असून ते खास चोरी करण्यासाठी मुंबईत येतात. सध्या सर्व फरार आरोपीचे शोध कस्तुरबा मार्ग पोलीस घेत आहेत. 


ऐन दिवळीत  घरातील  सोन्याचे दागिने आणि पैशांवर चोरांनी डल्ला मारल्याच्या अनेक घटना समोर येतात. दिवाळीनिमित्त घरातील मंडळी बाहेर गेल्याने चोरींनी संधी साधून दागिन्यावर डाव मारणारी टोळी दिवाळीच्या काळात सक्रिय होते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :