Chandrakant Patil News: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Pune) हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली.   एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील यावेळी शाई फेकणारा व्यक्ती करत होता. त्या व्यक्तिचं नाव अद्याप समजलेलं नाही. या प्रकरणाचा भाजपकडून निषेध व्यक्त केला जात आहे तर शिवसेना, राष्ट्रवादीनंही शाईफेक करणं निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. 


संस्कृतीला काळीमा फासणारा प्रकार: प्रवीण दरेकर


महाराष्ट्र राज्याचं चांगलं नेतृत्व म्हणून चंद्रकांत पाटलांकडे पाहिलं जातं. त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आणि काळीमा फासणारं आहे. अशा विकृत मानसिकतेला मुळासकट उपटून ठेचण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं त्यावेळी त्यांनी तात्काळ माफी मागितली आहे. त्यामुळे हा प्रकार संस्कृतीला काळीमा फासणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे. 


शाईफेक करणाऱ्यांनी माफी मागावी: राम कदम
चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य छेडछाड करुन लोकांना ऐकवता. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. चंद्रकांत पाटील कोणताही शब्द गैर बोललेले नाहीत. विरोधकांचे वसुलीचे धंदे बंद झालेत. या सगळ्यांबाबतची हतबलता या भ्याड हल्ल्यातून दिसून येते. शाईफेक करणाऱ्यांच्या घरात घूसून त्यांना कसं उत्तर द्यायचं?, हे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहित आहे. आम्ही कायदा हातात घेत नाही. शाईफेक करणाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम कदम यांनी दिली आहे. 


शाईफेक करणं योग्य नाही: शंभूराज देसाई
चंद्रकांत पाटलांकडून भाषणात झालेल्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक थोरपुरुषांचा अपमान करणं, असा उद्देश नेत्यांचा नसतो. मात्र भाषणाच्या ओघात एखादं विधान केलं जातं मात्र चूक लक्षात आल्यावर माफी मागितली जाते. त्यानंतरही शाईफेक करणं योग्य नाही. माफी मागितल्यावर हा विषय बंद व्हायला हवा होता, असं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं आहे. 


अजित पवार काय म्हणाले?
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाली यासंदर्भात संविस्तर माहिती घेऊन या घटनेवर प्रतिक्रिया देऊ, असं विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले. 
  
ठाकरे गटाच्या मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया...


शाईफेक करणं निषेधार्ह आहे. प्रगत समाजाचं हे लक्षण नाही. याचा शिवसेना पक्ष म्हणून आम्ही निषेध करत आहोत. सुरुवातील आक्षेपार्ह विधानं करायची आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची. अनुदान घ्यायचं म्हणून कोणी शाळा चालु केल्या का? सामाजिक हेतू म्हणून त्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. लोकवर्गणी हा शब्द चंद्रकांत पाटलांना माहित नसेल तर तो शब्द त्यांनी शिकून घ्यावा, असा सल्ला शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. 


शाईफेक निषेधार्ह आहे: रोहित पवार


चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतंच पण त्याला विरोध म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक ही निषेधार्ह आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा होणारा अपमान हा आजचा नाही तर पूर्वापार होत आला असून त्याला विरोध करणं ही आपली वैचारिक लढाई आहे. ती संविधानिक मार्गानेच लढायला हवी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. 

 

ही बातमी देखील वाचा