Mumbai: ऑनलाइन आणि घरपोच डिलीव्हरी सुविधा असलेल्या दुकानातून खरेदीचा (Online Transaction) ट्रेंड सध्या घराघरांत दिसून येतो. उच्चभ्रू वस्तीत राहणारे वाइन, बियर, अन्य प्रकारचे मद्यही मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीनं खरेदी करतात. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार अनेकांची फसवणूक करीत आहेत. यातच ऑनलाईन व्हिस्की ऑर्डर करणं प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील एका अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलंय. दरम्यान, ऑनलाईन व्हिस्की ऑर्डर करताना खात्यातून 3 लाख 5 हजार गायब झाल्याचं अभिनेत्रीनं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय. 


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अभिनेत्रीच्या पुतण्याचं पुण्यात लग्न होतं. यानिमित्त त्यांनी आपल्या पुतण्याला अमृत व्हिस्कीची बॉटल भेट म्हणून द्यायचं ठरवलं. यासाठी त्यांनी गुगलवर वाईन शॉपचे नंबर शोधले. त्यावेळी त्यांना गुगलवर दोन मोबाईल क्रमांक मिळाले. यापैकी एका नंबरवर त्यांनी कॉल केला आणि व्हिस्कीसाठी 4 हजार 800 रुपये दिले. मात्र, बराच उशीर होऊनही डिलिव्हरी मिळाली नाही. ज्यामुळं त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून पैसे परत करण्यास सांगितलं.  मात्र, कोणत्याही परताव्यासाठी सरकारी नियमांनुसार वाईन शॉपमध्ये ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचं समोरून सागण्यात आलं. 


दरम्यान,  सायबर गुन्हेगारांनी परतवा प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत त्यांच्या डेबिट कार्डचा तपशील मागितला आणि मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपी विचारला. मात्र, ओटीपी क्रमांक सांगितल्यानंतर अभिनेत्रीच्या खात्यातून 3.05 लाख रुपये  गायब झाले. त्यानंतर अभिनेत्रीनं आरोपीला अनेकदा फोन केला. पण त्यानं फोन उचलला नाही. थोड्यावेळानंतर पुन्हा कॉल केल्यानंतर त्यानं मोबाईल बंद केल्याचं अभिनेत्रीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-