Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू झाल्यामुळे व तोच या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याने न्यायालयात अबेटेड समरी दाखल करून हे प्रकरण बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


बदलापूर शाळेतील संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे या आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. ते सापडल्यावर त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र प्रत्यक्ष लैंगिक अत्याचाराच्या घटनेशी त्यांचा संबंध नाही, असा दावा देखील करण्यात येत आहे. 


शाळेतील विश्वस्तांवर चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका-


माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केतन तिरोडकर यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, असा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. 


वडिलांसह अक्षय शिंदेचे नातेवाईक काय म्हणाले?


बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी केला आहे. अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील अण्णा शिंदे (अक्षयचे वडील) यांनी केली. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आरोपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई- वडील सोमवारी सकाळी गेले होते. मुलाला भेटण्याचे टोकन मिळाले नव्हते. त्यांना दुपारी 3.30 वाजता येण्यास सांगण्यात आले. साधारण 3.45 वाजता ते गेल्यानंतर अक्षयची आणि आमची 20 मिनिटांसाठी भेट झाल्याची माहिती अण्णा शिंदे यांनी दिली.  माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा सवाल अक्षयच्या आईने उपस्थित केला. 


संबंधित बातमी:


Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?


Akshay Shinde Encounter: '...अन् मी अक्षय शिंदेवर गोळी झाडली'; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण, FIR मधील जबाब आला समोर