बिहार : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) पक्षाचे बिहारमधील (Bihar) नेते आरिफ जमाल (वय 40 वर्ष) यांची शनिवारी संध्याकाळी बिहारमधील सिवानमध्ये अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या (Murder) केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने आरिफ यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. याशिवाय या हत्येमागील कारण काय, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एमआयएमचे नेते आरिफ जमाल हे सिवानचे जिल्हाध्यक्ष होते. तर, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली.
आरिफ जमाल यांचे फास्ट फूडचे दुकान आहे. ही घटना रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास घडल्याची सांगितले जात आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. नागरिकांनी तत्काळ जखमी आरिफ यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दुकानात बसले असतांना अचानक गोळीबार झाला...
या प्रकरणी हुसैनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय यादव यांनी सांगितले की, आरिफ जमाल यांची अज्ञात लोकांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ते दुकानात बसले असतांना अचानक आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. गोळी त्यांच्या पोटात लागली होती. स्थानिक नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरिफ यांनी लढवली होती विधानसभा निवडणूक...
आरिफ जमाल यांनी यापूर्वी निवडणूक लढवली असल्याचे देखील सांगितले जात आहे. 2015 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता पक्षाकडून रघुनाथपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूकही लढवली. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.
जलील यांचे ट्वीट...
बिहारमधील एमआयएमचे नेते आरिफ जमाल यांच्यावर झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध केला आहे. जलील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "या हत्येचा तीव्र निषेध करतो. दोषींना तात्काळ अटक करण्याची आमची मागणी आहे,” असे जलील यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: