नागपूरः शहरातील होणाऱ्या पार्ट्यांमुळे तरणाई नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. यातच आता नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 25 लाख रुपये किंमतीचे एमडी (MD powder) पावडर हे ड्रग्स जप्त केले आहे. यात एका तडीपार आरोपीलाही अटक करण्यात आली आहे, हे विशेष.


तस्करांकडून मोठ्या प्रमाणात एमडी या ड्रग (Drug) पावडरचा सौदा होणार असल्याची गुप्त सूचना नागपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे खापरी परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर तैनात केले. आरोपी तेथे आले असता त्यांच्या कारची व त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे 250 ग्राम वजनाची एमडी पावडर आढळली.


पोलिसांनी इब्राहीम खान अकबर खान (53, हसनबाग), फारूख शेख मेहमूद (42, मोठा ताजबाग, सक्करदरा) आणि वाहीद खान रिझवान खान (व. 35, मोठा ताजबाग, सक्करदरा) या तिघांना अटक केली. यातील इब्राहीम खान अकबर खानवर अगोदरच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांकडूनही 25 लाखांच्या ड्रग्जसह 26 लाख 65 हजारांचा माल जप्त करण्यात आला.


बदलापूर कनेक्शन


शहरात काही महिन्यांपासून विविध भागात ड्रग्सचे वितरण करण्यात येत होते. यातील तस्करांबाबत योग्य टीप मिळत नसल्याने पोलिस (Nagpur Police) यांच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर कशी पोहोचली याची माहिती घेतली असता बदलापूर (Badlapur) येथील आदिल शेख याचे नाव पुढे आले आहे. पोलिस सध्या आदिल शेख याच्या मागावर आहेत.


श्वानांच्या पिलांवर टाकले उकळते पाणी


दुसऱ्या एका घटनेत अंबाझरी हिलटॉप परिसरात एका महिलेने कुकरमध्ये उकळलेले पाणी श्वानांच्या नुकत्याच जन्मलेल्या चार पिलांच्या अंगावर टाकले. यामुळे हे पिल्ले गरम पाण्यामुळे लाल झाली. स्थानिक नागरिकांनी या पिलांवर प्रथमोपचार केले. त्यानंतर मांगल्य बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष चैताली भस्मे यांनी गंभीर जखमी झालेल्या पिलांवर उपचार केले. याची तक्रार पोलिसांना देण्याची चर्चा सुरु होताच महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर तक्रार देण्याचे टाळून नागरिकांनी तिला समज देऊन सोडले.