Nanded News Updates : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने आणखी दोघांना अटक केली आहे. ज्यात नांदेड जिल्ह्यातील कुख्यात मटका किंग कमल यादव आणि गुरुप्रितसिंग खेरा या दोघांना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांनाही 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. 5 एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची घरासमोरच दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटीने 13 जणांना अटक केली होती. या सर्व आरोपींनी कट रचून बियाणी यांची हत्या केली होती.


नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची आज काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.  या हत्येप्रकरणी  ताब्यात घेतलेल्या नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुख्य मारेकऱ्यांची व शस्त्रांची माहिती न मिळाल्याने कोठडीत वाढ करण्यात आली आहे.


संजय बियाणी यांच्या  हत्येने नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ माजली होती. नांदेड जिल्ह्यातील उद्योजक, क्लासेस चालक, डॉक्टर, यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेक व्यावसायिक व उद्योजकांनी आपले उद्योग गुंडाळून नांदेड शहर सोडले आहे. दरम्यान संजय बियाणी यांची हत्या करून मारेकरी पळ काढण्यात यशस्वी झाले होते. त्यासाठी पोलिसांनी SIT गठीत करून SIT चे तीन पथके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा,आंध्रप्रदेश या विविध राज्यात तपासासाठी रवाना करण्यात आली होती. परंतु दोन महिने उलटूनही पोलिसांना आरोपींचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला जात होता. 


तर संजय बियाणी यांच्या तपासाविषयी पत्नी अनिता बियाणी आणि खासदार प्रताप पाटिल चिखलीकर यानी आक्षेप घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.  हत्या होऊन तब्बल 55 दिवसानंतर आरोपीचा शोध लावण्यात नांदेड पोलिस यशस्वी ठरले होते. नांदेड पोलिसांनी 55 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हरियाणा,पंजाब, नांदेड ,उत्तर प्रदेश ,तेलंगणा या राज्यातून आतापर्यंत 15 आरोपींना ताब्यात घेतले आहे.


कोण होते संजय बियाणी?



  • संजय बालप्रसाद बियाणी हे मूळचे नायगाव तालुक्यातील कोळंबी येथील मूळ रहिवाशी होते.

  • ग्रामीण भागातून येऊन नांदेड सारख्या शहरात स्वतः चा उद्योग उभारून एक वेगळी ओळख निर्माण केली.

  • केबल TV व्यवसाय, मेडिकल स्टोर, जमीन खरेदी विक्रीतून व्यवसायाची सुरुवात केली.

  • बियाणी डेव्हलपर्स या नावाने नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख.

  • चार महिन्यांपूर्वी 72 गरीब माहेश्वरी समाजातील कुटुंबांना घरे वाटप केली.

  • लग्न समारंभ, धार्मिक,सामाजिक कार्यक्रम, सर्वसामान्य, गरीब, गरजवंतांना नेहमीच मदतीचा हात देणारे अशी समाजात ओळख.

  • नांदेड शहरातील राज मॉल, बियाणी हाईट्स, राज हाईट्स, राज मॉल,1,2 ,3, 4 ,5 अशी विविध व्यावसायिक व रहिवाशी इमारती त्यांच्या मालकीच्या आहेत.