उत्तर प्रदेश : दोघा भावांनीच सख्ख्या भावाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वहिनीसोबत लग्न केल्याच्या रागातून भावांनीच भावाचा खून केला. उत्तर प्रदेशच्या बागपतमधील या घटनेनं सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. दोन भावांनीच मिळून आपल्याच भावाची हत्या केली आहे. मयत भावाचा नेमका गुन्हा काय असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर, त्याचा गुन्हा एवढाच होता की, त्याने आपल्या मोठ्या भावाच्या विधवेशी लग्न केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.


छोट्या भावानं केलं वहिनीसोबत लग्न


बागपतचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एनपी सिंह यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. एका व्यक्तीला गोळी मारण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यशवीर, वय 32 वर्ष असं मृताचं नाव आहे. यशवीरची हत्या त्याच्या मोठ्या भावांनी केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. 


नाराज भावांनी सख्ख्या भावालाच संपवलं


उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये राहणारे ईश्वर यांना सुखवीर, ओमवीर, उदयवीर आणि यशवीर अशी चार मुले आहेत. ईश्वर यांचा मुलगा सुखवीरचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी रितूने त्याचा लहान भाऊ यशवीरसोबत लग्न केलं. भावाने वहिनीसोबत लग्न केल्याचं इतर दोन भावांना खटकलं. दोघांना हे लग्न पटलं नाही, त्यामुळे कुटुंबात वारंवार भांडणे होत होती. या लग्नावरुन भावंडांमध्ये वारंवार खटके उडत होते. याचं वादातून दोन भावांनी तिसऱ्या भावाचा काटा काढला.


धक्कादायक घटनेने खळबळ


यशवीर याने त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर वहिनीसोबत लग्न केलं. यशवीर दिल्लीत बस चालक म्हणून कार्यरत होता. यशवीर शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून घरी परतला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत ओमवीर आणि उदयवीर या दोघांनी यशवीरसोबत वाद घातला. हा वादनंतर टोकाला गेला. यानंतर ओमवीर आणि उदयवीरने यशवीरची गोळी मारुन हत्या केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यशवीरचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


आता आईस्क्रीममध्ये सापडली गोम, महिलेचा अमूल कंपनीवर गंभीर आरोप; VIDEO VIRAL