बीड : बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गेले सहा महिन्यात अनेकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या मुलीचं न कळत्या वयात लग्न झालं होतं मात्र सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं घर सोडलं. मात्र तिचे हाल तिथे संपले नाहीत. बेघर असलेल्या या मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर आणि मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये मागच्या सहा महिन्यापासून एका बेघर झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार चालू होता. अखेर एका महिलेने रस्त्यावर फिरणाऱ्या या मुलीला जवळ बोलावले आणि हे दाहक वास्तव समोर आलं.
घरातून बाहेर पडल्यानंतर ही पीडित मुलगी अंबाजोगाईच्या रस्त्यावर भीक मागत फिरू लागली. तिचा फायदा घेऊन अनेकांनी तिच्यावर वारंवार अत्याचार करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने आपल्या जबाबात सांगितल आहे. या मुलीवर अत्याचार करणाऱ्या चार जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलय
पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी मागच्या सहा महिन्यात चारशे पेक्षा जास्त वेळा या मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती बालकल्याण समितीने दिली आहे. ही पीडित मुलगी आता बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही मुलगी काही महिन्याची गर्भवती असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचा गर्भपात करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :