नांदेड : नांदेड जिल्ह्यात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सर्वत्र शांततेत पार पडत असताना 14 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड शहरातील सिडको परिसरातील बळीरामपुर येथे डीजेच्या गाण्यावर नाचण्याच्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्याचे! या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात दोन मारेकरी आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झालीय. दरम्यान या उत्सवाला बळीरामपूर येथे एका खूनाच्या घटनेने गालबोट लागले. काल मध्यरात्री सिडको येथील नाईक महाविद्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला अशी माहिती पोलिसांनी दिलीय. बळीरामपूर भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रात्री उशिराच्या सुमारास नाईक कॉलेजसमोर पोहचली. त्या दरम्यान बळीरामपूर येथील किशोर ठाकूर आणि शेख आदिल असे दोघे मिरवणुकीत इतरांना अडथळे आणत नाचायला लागले. तेव्हा सचिन उर्फ बंटी थोरातने त्या दोघांना मिरवणुकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या किशोर ठाकूरने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरातच्या शरिरावर अनेक ठिकाणी सपासप वार केले आणि भोसकले. तसेच सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यासही चाकू मारून जखमी केलेय. या चाकू हल्ल्यात सचिन थोरात याचा मृत्यू झाला असून सुमेध वाघमारे गंभीर जखमी झाला आहे.या घटनेनंतर हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदिल हे दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलेय.
जखमी सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू असून रात्री साडेबाराच्या सुमारास जखमीच्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर ठाकूर आणि शेख आदिलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302,307,34 आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम 3 (2) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्ही आरोपिना अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन्ही आरोपिना चार दिवसाची पोलीस कोठड़ी मिळाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) डॉ. भोरे हे करत आहेत.