Cyber Crime News: गेल्या काही दिवसांत सायबर क्राईममधील (Cyber Crime) घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. वेगवेगळ्या लिंक पाठवून सायबर भामटे एका क्षणात तुमचे बँक खाते (Bank Account) खाली करतात. आता असाच काही प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. तुमचे एसबीआय बँकेचे (SBI Bank) युनो खाते बंद होत आहे, असा मेसेज आल्याने पॅन कार्ड अपडेट (PAN Card Update) करण्यासाठी आलेल्या लिंकवर क्लिक करणाऱ्या वकिलाच्या खात्यावरून दीड लाख रुपये काही क्षणात सायबर भामट्याने उडवले आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.


जगत नारायण राजकरण सिंग (एन 2, रामनगर, ह. मु. नोएडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सर्वोच्च न्यायालय (दिल्ली) येथे वकील आहेत. त्यांचे स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या क्रांती चौक शाखेत खाते आहे. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाइलवर 626879755 या क्रमांकावरून मेसेज आला. एसबीआयचे युनो खाते बंद करण्यात आले असून कृपया पॅन कार्ड अपडेट करा असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता. सोबतच https://tinyrl.com/SBI / KYCON LINES अशी लिंक देण्यात आली होती.


लिंक उघडताच पैसे गायब...


जगत नारायण यांनी सदर लिंक ओपन केली. ही लिंक ओपन केल्यानंतर यामध्ये पॅनकार्डचा कोणताही ऑप्शन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ही लिंक बंद केली. दरम्यान, काही क्षणात त्यांच्या खात्यावरून 1 लाख 49 हजार 999 रुपये कपात झाल्याचा मेसेज आला, असे त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे करत आहेत.


सायबर गुन्ह्यात वाढ...


आजकाल प्रत्येक व्यक्तीजवळ स्मार्टफोन आले असून, मोबाईल क्रमांक बँकसोबत जोडलेला असतो. त्यामुळे याचाच फायदा घेत सायबर भामटे वेगवेगळ्या शक्कल लढवत बँकेतील पैश्यांवर दरोडा टाकत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात अशा घटनांमध्ये सतत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सुरवातील फोनवरून बोलून OTP  मागत हे सायबर भामटे खात्यातून पैसे काढून घेत होते. मात्र आता तुमचं खाते बंद पडला आहे, आधार कार्ड अपडेट करा, पॅनकार्ड लिंक करा असे वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेज करून त्यासोबत एक लिंक देतात. त्या लिंकवर क्लिक करताच खात्यातील पैसे आपोआप कपात होतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमचा OTP शेअर करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहेत.