Maharashtra Mumbai Crime News : एटीएम (ATM) सेंटरमध्ये एटीएम कार्डची हेराफेरी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगराला माहिम पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीविरोधात एटीएम कार्डाची अदलाबदल करून लोकांना आर्थिक गंडा घातल्या प्रकरणी अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 


माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी फिर्यादी महिलेला स्टेट बँक ऑफ इंडियाचं नवीन डेबिट कार्ड मिळालं होतं. त्यामुळे त्या कार्डचा पिन नंबर सेट करण्यासाठी तक्रारदार महिला माहिम येथील पॅराडाईज सिनेमागृहा जवळील एका एटीएममध्ये गेली होती. पण कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकून पिन जनरेट करत असताना महिलेनं तीन वेळा चुकीचा पिन टाकल्याचा मेसेज आला. त्यावेळी असलेल्या टोपी घालून महिलेच्या मागे उभ्या एका इसमानं मशीनमधून आलेलं स्टेटमेंट खाली पडल्याचं सांगितलं. स्टेटमेंट उचलण्यासाठी खाली वाकल्यानंतर आरोपीनं हातचलाखीनं एटीएम कार्डची अदलाबदली केली आणि तिथून पळ काढला. त्यानंतर थोड्या वेळानं तक्रारदार महिलेच्या कार्डवरुन खेरदी केल्याचा मेसेज आला. काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येताच, त्यांनी बँकेच्या माहिम शाखेत जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पण तोपर्यंत एटीएम कार्डवरुन तब्बल 70 हजार रुपयांची खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. महिलेच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यातस कलम 419, 420 भा. द. वि सह 66 (क) (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दकाल करण्यात आला आहे. 


महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि आजुबाजूच्या परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासलं. अखेर माहिम जंक्शन येथे संशयित आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी अखेर सापळा रचून संभव कुमार आचार्य (32) याला ताब्यात घेतलं. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला. आरोपीनं याआधीही अशा अनेकांना फसवलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींना एटीएम कार्ड व्यवस्थित वपरता येत नाही, अशाच व्यक्तींना आरोपी टार्गेट करायचा. अशा व्यक्तींचं कार्ड हात चलाखीनं बदलून तो आर्थिक फसवणुक करत असल्याचा खुलासा झाला. तसेच, आरोपीविरोधात दादर, वरळी, जुहू, साकीनाका, अंधेरी, डि.एन.नगर यांसारख्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :