Maharashtra Kalyan Crime News : भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला 15 दिवस उलटले मात्र अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती न लागल्याने भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी चव्हाण म्हणाले की, शहरात काही वाईट प्रवृत्तीचे लोकं गुंड घेऊन शहराचे वातावरण खराब करत आहेत, हल्ल्यामागे कोण आहे? हल्ला कशामुळे झालाय? यामध्ये राजकीय लोक आहेत याची माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे, मात्र त्या दिशेने तपास होत नाही.15 दिवस उलटूनही आरोपी अटक नाहीत.लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे. ज्याने हे घडवलं त्याचा छडा लागणे गरजेचं आहे. तसेच मंगळवारी भाजपच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पोलिसांना दिला आहे.
हल्ल्यामागे राजकीय व्यक्ती असल्याची माहिती देऊन देखील त्या दिशेने तपास केला जात नाही. आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्था मंगळवारी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार आहे, असा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
डोंबिवलीतील मनोज कटके या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापि हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जखमी मनोज कटके यांची भेट आरोपीना तत्काळ अटक करा , अन्यथा पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशारा दिला होता. घटनेला 15 दिवसांचा कालावधी लोटला मात्र अद्याप आरोपी न सापडल्याने भाजपने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. आज भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यानी डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट जलदगतीने तपास करण्याची मागणी केली. या प्रकरनात 307 अंतर्गत कलम लावण्यात आला नाही, असेही ते म्हणाले.