Maharashtra Jalna News : जालना (Jalna) शहराजवळील नागेवाडी येथे दोन गटांत कंपनीमधील कामाच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जालना औरंगाबाद रोडवर नागेवाडीजवळ दोन गटांत झालेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं असून या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घनस्थळी भेट देत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 


बदनापूर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक साईनाथ रामोड आपल्या खाजगी वाहानानं तपास करण्यासाठी जात असताना त्यांना जवळच्याच ढाब्यावर दोन गटांत तुंबळ हाणामारी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. जालना औरंगाबाद रोडवरील हॉटेल पंजाब ढाबा समोर दहा ते पंधरा जणांच्या दोन गटांमध्ये लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांड्यांनी, लोखंडी पाईपनं ऐकमेकांना मारहाण चालू होती. त्यामुळे रामोड यांनी तिथे थांबून भांडणं करु नका असं समजावण्यास सुरुवात केली. पण कोणीच त्यांचं ऐकत नव्हतं. काही काळ थांबल्यानंतर हाणामारी पुन्हा सुरु झाली. रामोड यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी गोलवाल यांनी सदर लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. दोन गटांमधील लोक एकमेकांचा जीव घेण्याच्या प्रयत्नात होते. 


सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, या उद्देश्यानं सहाय्यक पोलीस निरिक्षक साईनाथ रामोड यांनी त्यांच्या जवळील शासकीय पिस्टलमधून एक राउन्ड हवेत वरच्या दिशेनं फायर केला आणि सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली. 


चंदनझिराचे पोलीस निरीक्षक नाचन यांनी सदर घटनेत जखमी झालेल्या लोकांची आणि घटनेची माहिती घेतली असता सदर ठिकाणी राहुल दिलीप म्हस्के, अमोल अंकुश शेंडगे, दिनेश विष्णु गडबडे, अमोल कचरु नावकर, अरुण राजु भोसले, निखिल परमेश्वर पवार, रोहीत राहुल भालेराव आणि इतर दहा ते बारा जण आणि ज्ञानेश्वर वांधुडे, गणेश वाघुंडे, अंकुश वेताळ, कृष्णा वाळके, संतोष गायकवाड, विकास एंखडे, देवेश एखंडे आणि इतर दहा ते पंधरा जण यांच्यात एमआयडीसी फेज थ्री नागेवाडी येथील आर. एस. प्लान्ट कंपनी येथील सिक्युरिटीच्या ठेकेदारी कारणावरुन वाद होऊन भांडणं झाल्याचं समोर आलं. 


दरम्यान, भांडणामध्ये ज्ञानेश्वर बांधुडे, गणेश वांघुडे, कृष्णा वाळके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु आहे.