Crime News : कर्नाटकातील धारवाड येथून पोलिसांनी MBA च्या विद्यार्थ्यासह पाच जणांना अटक केली आहे. पीडितांकडून 40,000 रुपये वसूल करण्याचे त्यांचे लक्ष्य असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


कर्ज अ‍ॅप फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ
महाराष्ट्र सायबर कार्यालय येथे NCCRP पोर्टलच्या माध्यमातून लोन अ‍ॅपसंदर्भात एकूण 2084 तकारी प्राप्त झाले आहेत. कर्ज अ‍ॅप फसवणूक प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ झाल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले होते. सायबर फसवणुकीच्या वाढत्या तक्रारींनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 24 ते 27 पीडितांपर्यंत संपर्क साधला. एका पीडितेच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.


व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
पोलिसांनी सांगितले की, पीडितेने 8,000 रुपये कर्ज घेतले होते. पण सोशल नेटवर्किंग साइटवर मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून  93,000 रुपये वसूल करण्यात आले. तसेच कर्ज अ‍ॅप प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर नोडल पोलीस ठाणे येथे एक गुन्हा नोंदविण्यात आला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याबाबत निर्देश दिले होते. या गुन्हयातून धुळयातून एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, त्यांच्याकडील फोन नंबर्सचे व्हॉट्सअॅप हे त्यांच्या नकळत कोणीतरी वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


आणखी 4 जणांना ताब्यात घेतले
त्यानंतर तांत्रिक तपासात आम्हाला असे दिसून आले की, धारवाड़ कर्नाटक येथील एक व्यक्ती ही धुळयातील व्यक्तीचा नंबर व्हॉट्सअ‍ॅपसाठी वापरत होता. पोलिसांनी दिनांक 11 जून रोजी पोलीस उपायुक्त, गुन्हे, धारवाड कर्नाटक यांच्याशी बोलून पुढील तपासाकरीता पोलिसांचा एक गट पाठविण्यात आला. तसेच त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले व त्याच्या फोनचे त्वरीत विश्लेषण करून स्थानिक पोलीसांसह रात्रभर केलेल्या संयुक्त कारवाईत आणखी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले.


5 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
या प्रकरणी पाचही जणांना गुन्हयात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे. सुहेल सय्यद 24, अहमद रजा हुसेन 26, सय्यद अख्तर 24, मुफ्तियाज परिजादे 21 आणि मोहम्मद कैफ कादरी 23, सर्व कर्नाटकातील धारवाड अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.