Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांच्या (Aurangabad City Police) गुन्हे शाखेच्या पथकाने विम्याची रक्कम हडपण्याचा डाव रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्यात यातील मुख्य आरोपी आधी ट्रक विक्री करायचा आणि नंतर स्वतःच ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद पोलिसांत नोंदवायचा. मात्र पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत अधिक चौकशी केली असता, चोरीची तक्रार देणारा फिर्यादीच यात आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी तिघांना ताब्यात घेऊन सातारा पोलिसांच्या हवाली केले आहे. संतोष प्रभाकर अंगरख (वय 38 वर्षे , रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर), बहादूरसिंह चौहान आणि प्रतीक मिसाळ असे या आरोपींचे नावं आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष प्रभाकर अंगरख याचा ट्रान्सपार्ट व्यवसाय असून, त्याने 14 फेब्रुवारीला सातारा पोलिस ठाण्यात आपला ट्रक चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली होती. ज्यात 5 डिसेंबर रोजी सायंकाळी त्याची अशोक लेलँड ट्रक (क्र. एमएच 20 ईएल 4332) बजाज कंपनी गेटसमोरील बाबा गॅरेजवर दुरुस्तीसाठी उभा केला. दरम्यान, त्याच्या मेव्हण्याची प्रकृती बिघडल्याने अंगरख हा अहमदनगरला गेला होता. मात्र नगरहून 10 डिसेंबर रोजी तो परत आल्यावर, त्याला ट्रकच आढळून आला नाही. दरम्यान गॅरेजचालक बाळू मिस्तरी देखील त्या दरम्यान गावाला गेल्याचे सांगितल्याने तो चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करत, संतोष अंगरखने सातारा पोलिसात तक्रार दिली होती. 


अन् रॅकेटचा पर्दाफाश झाला.


दरम्यान अख्खा ट्रक चोरीला गेल्याने आणि गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी सुरू केला. दरम्यान पोलिसांनी ट्रक चोरी झाल्याचा दावा करण्यात आलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात कुठेही ट्रक चोरीला गेल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शिंदे यांनी अंगरखसोबत गॅरेज चालकाची कसून चौकशी केली. त्यात गॅरेजचालक बोलताना अडकला आणि पोलिसांचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला, ज्यात वेगवेगळ्या संशयितांची नावे समोर आली. तेथेच फिर्यादी फसला आणि त्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुरावे दाखवत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 


विम्याच्या रकमेसाठी रचला डाव...


गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या चौकशीत संतोष अंगरख यानेच ट्रक ओळखी प्रतीक सुदाम मिसाळ आणि कल्याण उचित (रा. राजेशनगर) यांच्या मार्फतीने वाशीमला विकल्याची कबुली दिली. त्यानंतर इकडे शहरात चोरीची तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याने त्याने तत्काळ इंशुरन्स कंपनीकडे विम्याच्या रकमेसाठी दावा केला. ट्रक विकून त्या रकमेसह विम्याचे लाखो रुपये उकळण्याचा त्याचा डाव होता. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेमुळे त्याचा बनाव समोर आला. या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Aurangabad: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दोन हजार लिटर बनावट दारू पकडली; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त