Nashik Crime News : नाशिक (Nashik News) शहरांमधील पंचवटी (Panchavati) परिसरात भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील कॅश काऊंटर वरून तब्बल 17 लाखांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशिक शहरातील पंचवटी परिसरात पेठ फाट्याजवळ स्टेट बँकेची शाखा आहे. बँकेतील कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी जमा झाले रक्कम मोजून काउंटरवर ठेवली. चोरट्याने नोटांच्या बंडलामधील 17 लाख रुपये चोरुन नेले. हिशेब लागत नसल्याने सीसीटीव्ही तपासले असता ही बाब निदर्शनास आली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात एक चोरटा पैसे घेऊन पळून जाताना दिसत आहे. ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून ही चोरी केली आहे. या प्रकरणी बँकेची शाखा व्यवस्थापक युवराज दौलत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बँक व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे ही रोकड लंपास झाल्याचा आरोप होत असून पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजनुसार चोरट्याचा तपास सुरु केला आहे. या जबरी चोरीच्या घटनेमुळे बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या शाखांमध्ये सशस्त्र बंदुकीधारी सुरक्षा रक्षक असताना सुद्धा चोरट्याने कॅशिअरसह सर्वांच्या नजरेत धूळफेक करत सुमारे 17 लाखांची रोकड लंपास केली. यामुळे बँकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जेव्हा कॅशिअरने जमा केलेला रकमेचा हिशोब लावण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठ्या रक्कमेची तफावत आढळून आली. रक्कम कमी आढळून आल्यानंतर त्याने हा प्रकार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान आता या चोरीचा छडा लावत चोरट्याला बेड्या ठोकून त्याच्या जवळून रक्कम जप्त करण्याचे मोठ्या आव्हान पंचवटी पोलिसांपुढे उभे राहिले आहे. 


तीन तासांच्या रेकीनंतर....


दरम्यान चोरट्याने बँकेमध्ये सकाळच्या सुमारास प्रवेश केल्यानंतर सुमारे दोन ते अडीच तास चोरटा बँकेत बसून होता. त्याने बँकेतील सर्व हालचाल टिपत रेकी केली. कॅशिअरची कॅबिन ही जास्त खुली असून पाठीमागून जागा मोकळी आहे. रोखले नोटांचे बंडल मोजून त्यांच्या पाठीमागील टेबलावर ठेवत होते. ही बाब चोरट्याने हेरून त्यांने दुपारी दीड वाजेच्या  सुमारास थेट कॅशिअर कक्षाभोवती आतमध्ये जात पाठीमागील टेबलावरून नोटांचे बंडले अलगद उचलून काढता पाय घेतला. चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नसून पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी ही करण्यात येत असून तपास सुरू असल्याचे सहाय्यक निरीक्षक पडळकर यांनी सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mahavitaran : विदर्भात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम, तब्बल 52 कोटींच्या वीजचोऱ्या समोर