Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशातील इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोविंद कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला होळी (Holi 2022) साजरी करण्याची किंमत स्वतःचा जीव देऊन मोजावी लागली आहे. या तरुणानं स्वतःच छातीत चाकू खुपसून आपलं जीवन संपवलं आहे. होळी खेळण्याच्या नादात तल्लीन झालेल्या तरुणानं स्वतःच्या छातीवर चाकून सपासप वार केले. त्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तरुणाचा बेभान होऊन नाचला


ही धक्कादायक घटना बाणगंगा पोलीस हद्दीत येणाऱ्या गोविंद कॉलनीत घडली. येथे राहणारा एक तरुण गोपाळ (38) होळीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बेभान होऊन नाचत होता. नाचता नाचता अचानक त्यानं हातात एक चाकू घेतला आणि स्वतःच्याच छातीवर वार करण्याची अॅक्टिंग करु लागला. पण तो चाकू तरुणाच्या छातीत आरपार गेला आणि तरुण गंभीर जखमी झाला. क्षणार्धातच तो रक्तबंबाळ झाला. उपस्थितांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. 


बेभान होऊन नाचणारा तरुण होता नशेत 


गोपाळ जखमी झाल्यानंतर उपस्थित नातेवाईक आणि मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारा दरम्यान गोपाळचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं सांगितलं जात आहे की, होळी पार्टीत बेभान होऊन नाचणाऱ्या सर्व तरुण नशेत होते. त्यांनी दारु प्यायली होती. दरम्यान, गोपाळनंही दारुच्याच नशेत स्वतःच्याच छातीत चाकू खुपसल्याचंही सांगितलं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha