Ahmednagar Crime News : जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील पती पत्नीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील कामकाज बंद ठेवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्य 25 जानेवारीला दोघेही राहुरी कोर्टात गेले. मात्र घरी परतलेच नाही. राजाराम जयवंत आढाव (52) व  मनिषा राजाराम आढाव (42) हे दोघे घरी न आल्याने 26 जानेवारीला राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेतली. 


सीसीटीव्ही फुटेजमार्फत पटली संशयितांची ओळख


पोलीस तपासात राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेली असल्याचे आढळले. या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग (रा. राहुरी) याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दांम्पत्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


खंडणीसाठी अपहरण अन् हत्या


पोलिसांनी अधिक तपास केला असता पाच जणांनी संगनमताने खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याचे समोर आले. मात्र खंडणीसाठी नकार दिल्याने 5 ते 6 तास त्यांचा एका घरात बांधून छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याच गाडीमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन जात रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यात प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर उंबरे गावातील स्मशानभूमीजवळील विहिरीत दगड बांधून मृतदेह पाण्यात टाकून देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 


राज्यभर आंदोलनाचा इशारा


या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. वकील संरक्षण कायदा करावा ही मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण होत नाही व त्यातच अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असल्याने नगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 2 तारखेला फडणवीस यांच्या भेटीत वकील संरक्षण कायद्याविषयी मार्ग न निघाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी दिला. 


राहुरी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण


दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. तर दुसरीकडे वकील संघटना मात्र आपल्या मागणीवर ठाम आहे. राहुरी तहसील कार्यालयासमोर वकील संघटनेच्या वतीने  साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सरकार वकील संरक्षण कायद्यासंदर्भात काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


आणखी वाचा 


Nashik Police : महिला सुरक्षिततेबाबत गुंडाविरोधी पथकाची धडक मोहीम; 12 टवाळखोरांवर कारवाई