मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. इक्बाल कासकर याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार असल्याने त्याला आज रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. 


इक्बाल कासकर याला आज सकाळी 11 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार असल्याने अॅडमिट करण्यात आलं आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणात तो सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.


गुरुवारी संध्याकाळी त्याला छातीत दुखू लागल्यानंतर कारागृहातील स्थानिक डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेनंतर त्याला आज सकाळी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले. यापूर्वीही त्याला अशाच कारणासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला गेल्या महिन्यातील 21 तारखेला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


खंडणी, मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक 


इक्बाल कासकर याच्याविरोधात फारसे गंभीर गुन्हे नसल्याने तो पाकिस्तानमधून भारतात परतला होता. मात्र त्याने दाऊदच्या नावाने धमकी देत खंडणी वसूली सुरू केली होती. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत गेल्या वर्षभरात तीन ते चार वेळा आपला संपर्क झाल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. दाऊदसोबत व्हिओआयपी कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्याचं आपल्या व्यवसायांवर नेहमी लक्ष असतं अशी माहिती इक्बालने दिली. 


काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत. 


एनआयएच्या कारवाईनंतर ईडीने मुंबईतील दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा नातेवाईकाशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. ईडी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी आणि हवाला व्यवहारांची चौकशी करत आहे. ईडीने इब्राहिम कासकरचीदेखील चौकशी केली आहे.