Latur Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, गुप्तांगात मिरची टाकून एका मजुरास बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात देखील पोलिसांकडून कोणतेही कारवाई करण्यात येत नव्हती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Social Media Video Viral) झाल्यावर आणि भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे. 


अधिक माहितीनुसार, लिफ्ट फिटिंग आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला लातूर येथील डॉक्टर प्रमोद घुगे यांनी संपूर्ण शरीर काळनिळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावर अमानुष मारहाण थांबली नाही, तर या मजुराच्या गुप्तांगात मिरचीची पूड टाकून पुन्हा महाराण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे 24 मार्च ते 28 मार्चपर्यंत पाच दिवस सतत दिवस-रात्र मारहाण करण्यात आली. तसेच याबाबत कुणालही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलीस जागे झाले आणि गुन्हा दाखल केल्याचा देखील आरोप होत आहे. 


मारहाणीचे कारण काय? 


मारहाण करण्यात आलेला मजूर लिफ्ट फिटिंग आणि दुरुस्तीचे काम करतो. दरम्यान, 2021 मध्ये त्याने लिफ्टच्या व्यवहारात काम नीट केलं नसल्याने आपल्याला 1 कोटींचे नुकसान झाल्याचे म्हणत या मजुराला लातूर येथे काम सुरू असताना उचलून नेण्यात आलं. तसेच 24 ते 28 मार्चपर्यंत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या गुप्तांगात मिरची टाकली. तसेच 50 लाखांची मागणी करण्यात आली. पाच दिवस सुरु असलेल्या मारहाणीनंतर एका बाँड पेपर आणि चेकबुक वर त्याच्या सह्या घेऊन 28 तारखेला दुपारी बारा वाजता लातूर येथील रेल्वे स्टेशनवर त्याला आणून सोडण्यात आले. 


पोलिसांकडून दादा मिळाली नाही...


बेदम मारहाण आणि अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर संबंधित मजुराने पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण , पोलिसांकडून त्याला कोणतेही दाद मिळाली नाही. याबाबत त्याने शेवटी भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडे तक्रार केली. सदर घटनेचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन लावून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन कट केला. त्यानंतर सुधाकर भालेराव यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना संपर्क करत कैफियत मांडली. या सर्व घटनेचा फोन कॉल आता लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 


गुन्हा दाखल होताच आरोपी फरार...


माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा फोन कॉल व्हायरल झाला. तसेच, मारहाणीचा व्हिडिओही देखील समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, शहर पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकरणातील दोषी डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याचे दोन सहकारी फरार झाले आहेत. आम्ही गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू असल्याचे फुंदे म्हणाले. 


कोण आहेत डॉक्टर प्रमोद घुगे?


लातूर येथील प्रसिद्ध किडनीविकार म्हणून डॉक्टर प्रमोद घुगे यांची ओळख आहे.  काही महिन्यापूर्वीच त्यांनी नवीन अद्यावत हॉस्पिटलचा बांधकाम पूर्ण केले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला लातूरतील सर्वपक्षीय राजकारणी आले होते. तसेच एक केंद्रीय मंत्री देखील हजर होते. याच हॉस्पिटलमधील लिफ्टच्या बांधणीवरून डॉक्टर प्रमोद घुगे आणि मारहाण झालेल्या मजुरात वाद सुरु होता. माझं नुकसान झालं आहे आणि ते नुकसान भरून देण्यात यावं यासाठी डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मजुराचे अपहरण करत अमानुष मारहाण केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


लातूरमध्ये कोयता गँगची दहशत पोलिसांनी जागेवर मोडून काढली, धिंड काढत धडा शिकवला