Latur Crime News: लातूर जिल्ह्यातील (Latur District) जळकोट शहरात (Jalkot City) एका घटनेनं खळबळ माजली आहे. जळकोट शहरातील उद्घाटना अभावी बंद असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात 70 वर्षी वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळं जळकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा (Department of Public Works) भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या जळकोट येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत देह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव सोपान मल्हारी मददेवाड असं आहे. मृत व्यक्ती जळकोट तालुक्यातील विराळ येथील रहिवासी असून निराधार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही व्यक्ती याच वसतीगृहात एकटीच राहत होती. पोलिसांना याप्रकराची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी जळकोट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या ग्रामीण भागांतील मुलींना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी, म्हणून भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ मागासवर्गीय मुलींसाठी 125 क्षमतेचं वसतिगृह बांधण्यात आलं आहे. या इमारतीचं बांधकाम होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र ही इमारत आजही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जळकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत, ते उघड झालं आहे. याआधीही या वसतीगृहात अनेक लग्न समारंभ, जनावरं बांधणं, रात्रीच्या वेळी तळीरामांकडून धुमाकूळ घातला जाणं, असे अनेक प्रकार घडले आहेत. वेळोवेळी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंदर्भात तक्रार करूनही काहीच कारवाई झाली नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणाची शासनानं चौकशी करण्याची मागणी विराळ येथील नागरिक सध्या करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :