Ambernath: दहावीच्या परीक्षेला (10th Exam) घाबरून एका 16 वर्षांच्या मुलीनं थेट स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार बदलापूर (Badlapur) येथून समोर आलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचा हा खोटेपणा उघड झाला असून आता पोलीस तिच्यावर काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, या घटनेनंतर पालक वर्गामध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. 


बदलापूर पश्चिमेच्या मांजर्ली परिसरात राहणारी ही 16 वर्षीय मुलगी दहावीत शिकत असून काही दिवसात तिची परीक्षा सुरू होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी या मुलीने घरातून बाहेर पडत ट्रेनने परळ गाठलं. तिथून घरी फोन करून आपलं अपहरण झालं असून आपण अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पळून आल्याची कहाणी रचून घरच्यांना सांगितली. त्यावेळी घरच्यांनी आधी जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितल्यानं या मुलीनं दादर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. 


या गुन्ह्याचा तपास बदलापूर पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांना तिच्या अपहरणाचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळं तिच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता, परीक्षेला घाबरून आपणच घरातून निघून गेलो आणि अपहरणाचा बनाव रचल्याचं तिने कबूल केलं. त्यामुळं पोलिसांनीही डोक्यावर हात मारून घेतला. या सगळ्यानंतर आता या मुलीवर काही कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha