Kerala Crime News: आधी कोलकाता (Kolkata Case) बलात्कार आणि हत्या प्रकरण, त्यानंतर बदलापूर (Badlapur Case) अत्याचार प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. आरोपींना फाशी द्या, अशी एकच मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे. एकीकडे देशभरातून आक्रोश, संताप पाहायला मिळत आहे. असं असूनही दुसरीकडे मात्र, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याच नाव घेईनात. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 70 वर्षीय महिलेच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घरातलं सर्व सोनं साफ करुन निघून गेले. पण, चोरट्यांनी 70 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. 


केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे माणुसकीलाही लाज वाटली असेल. शनिवारी रात्री एका 70 वर्षीय महिलेच्या घरावर चोरट्यांनी दरोडा घातला. यादरम्यान, कथितरित्या महिलेवर अत्याचारही करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. 


पोलिसांकडून अटक 


पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ तपासाची सूत्रं हलवली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. केरळ पोलिसांनी कनककुन्नू इथून 29 वर्षीय धनेश नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीविरोधात वृद्ध महिलेच्या घरातून 7 तोळं सोनं चोरल्याचा आरोप आहे. याव्यतिरिक्त वृद्ध महिलेवर आरोपीनं बलात्कार केल्याचंही बोललं जात आहे. सोनं विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला ज्यावेळी समजलं की, वृद्ध महिला घरात एकटी आहे, त्यावेळी त्यानं घरावर दरोडा घालण्याचा प्लान आखला. आरोपीनं मिरची पावडर फेकून वृद्ध महिलेला आधी बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. दरोडा घातल्यानंतर आरोपी दरवाजा बंद करून निघून गेले. तसेच, महिलेला या घटनेची माहिती कुणालाच देता येऊ नये म्हणून तिचा फोनही आरोपी सोबत घेऊन गेले. ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांनी महिलेला रुग्णालयात नेलं. शेजाऱ्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. 


पोलिसांत गुन्हा दाखल 


घटनेबाबत बोलताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. घटना घडल्यानंतर आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तसेच, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी एकच मागणी नागरिकांकडून केली जात आहे.