Karnataka Murder Case : कोर्टातच पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटक येथे घडली आहे. अगदी काही वेळा पूर्वी या दाम्पत्याने सुखी संसार करण्याची हमी दिली होती. या दाम्पत्याने कौंटुबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. यानंतर दोघांचं काऊंसिलिंग सेशन झालं, यावेळी पती आणि पत्नी दोघांनीही मुलांसाठी सुखी संसार करण्याचं मान्य केलं होतं.
पतीने कोर्टातच चिरला पत्नीचा गळा
कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पती-पत्नी दोघेही समुपदेशन सत्रासाठी गेले होते. समुपदेशन सत्रादरम्यान, पती-पत्नीने मतभेद विसरून एकत्र राहण्याचे आणि त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचे मान्य केले होते. त्यांच्या लग्नाला सात वर्षे झाली होती. हल्ल्यानंतर त्या आरोपी पतीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. महिलेला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
नक्की काय घडलं?
कर्नाटकातील होलेनरसीपुरा कौटुंबिक न्यायालयात पती शिवकुमार आणि पत्नी चैत्र यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर पती-पत्नी दोघेही समुपदेशन सत्रासाठी गेले होते. काऊंसिलिंग सेशनमध्ये दोघांनी नातं वाचवण्यासाठी एक संधी देण्याचं ठरवलं. यानंतर बाहेर येताच चैत्र प्रसाधनगृहाकडे जात असताना त्याने पत्नीवर मागून हल्ला करत तिचा गळा कापला. यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण उपस्थितांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं.
हल्ल्यात पत्नी चैत्र गंभीर जखमी
पती शिवकुमारने केलेल्या हल्ल्यात पत्नी चैत्र गंभीर जखमी झाली होती. गळा कापल्यामुळे खूप रक्तस्त्राव होत होता. यानंतर तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर झालेली जखमी खोल होती त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला होता.
पोलिसांकडून पुढील तपास सुरु
पती शिवकुमार यांच्यावर हत्येचा आरोप आहे. आरोपी पती शस्त्रासह न्यायालयाच्या आवारात कसा घुसला याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिराम शंकर म्हणाले की, 'ही घटना न्यायालयाच्या आवारात घडली. आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त करण्यात आलं आहे. आम्ही याचा तपास करत आहोत. समुपदेशन सत्रानंतर काय घडलं? आरोपीनं न्यायालयात हत्यार कसं नेलं? हा पूर्वनियोजित खून होता का? अशा सर्व बाबींचा तपास सुरु आहे.'