Retired IPS Om Prakash Murder : कर्नाटकचे निवृत्त पोलिस महासंचालक ओम प्रकाश (Om Prakash Karnataka) यांच्या हत्येबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पत्नी पल्लवी आणि मुलीवर त्यांची हत्या करण्याचा आरोप आहे. डायनिंग टेबलवर बसून मासे खात असताना वाद झाला आणि ओम प्रकाश यांच्यावर दोन वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पत्नी आणि मुलली कृती हिला पोलिसांनी अटक केली आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश हे डायनिंग टेबलवर बसून मासे खात होते. त्याच वेळी त्यांचा पत्नी पल्लवीशी कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद झाला. हा वाद टोकाला गेला. चिडलेल्या पल्लवीने डायनिंग टेबलवरील चटणी ओम प्रकाश यांच्या डोळ्यात टाकली. वेदना सहन न झालेले ओम प्रकाश त्यावेळी सैरभैर झाले. त्यानंतर संधीचा फायदा घेत पल्लवीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये ओम प्रकाश जबर जखमी झाले आणि 20 मिनिटे तडफडत होते. 


ओम प्रकाश नेहमीच बंदुकीचा धाक दाखवून आपल्याला ठार मारण्याची धमकी द्यायचे असा आरोप त्यांच्या पत्नीने केला. पण त्यांच्या मुलाने, कार्तिकेशने मात्र त्याच्या आईवर आणि बहिणीवर वडिलांना मारल्याचा आरोप केला आहे.  


Retired IPS Om Prakash Murder : मित्राला व्हिडीओ कॉल केला


ओम प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना पल्लवी तिथेच होती. त्याचवेळी पल्लवीने तिच्या एका मित्राला व्हिडीओ कॉल केला आणि 'राक्षसाला मी मारून टाकलं' असं सांगितलं. त्यानंतर तिने पोलिसांना फोन करुन ओम प्रकाश यांची हत्या केल्याची कबुली दिली. 


पल्लवी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती


पल्लवी गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचा दावा त्यांच्या मुलाने, कार्तिकेशने केला. पल्लवी सिजोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असल्याचं कार्तिकेशने म्हटलं आहे. तिच्या उपचारावर मोठा खर्च होत असल्याने ओम प्रकाश चिंताग्रस्त होते अशी माहिती त्याने दिली. पल्लवी आणि बहीण कृतीनेच आपल्या वडिलांना मारल्याचं कार्तिकेशने म्हटलं असून त्या दोघींच्या विरोधात त्याने तक्रार नोंदवली आहे. 


ही घटना घडण्यापूर्वी एक आठवडापूर्वी आपल्या आईने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे वडील त्यांच्या बहिणीच्या घरी राहायला गेले होते. दोन दिवसांपूर्वी बहीण कृतीने सरिताच्या घरी जाऊन जबरदस्तीने वडिलांना घरी परत आणलं. त्यांची इच्छा नसतानाही तिने त्यांना घरी परत आणलं अशी माहिती कार्तिकेशने दिली. 


मुलाने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पल्लवी आणि कृती यांना अटक केली आहे. या हत्येमागे संपत्तीचा वाद होता का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.


Who Is Om Prakash IPS : कोण आहेत ओम प्रकाश? 


ओम प्रकाश हे मूळचे बिहारमधील चंपारण्यमधील असून जीओलॉजीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी असून 2015 ते 2017 या काळात कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक होते.