बंगळुरू : विवाहबाह्य संबंधातून कर्नाटकात एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध समजल्यानंतर झालेल्या वादातून पत्नीने कथितरित्या तिच्या पतीला पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले. यानंतर पती आग विझवत असतानाच प्रियकराने त्याच्या डोक्यात दगड घातल्याने गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील बड्डीहल्ली भागात रविवारी ही घटना घडली.
नारायणप्पा (वय 52) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो एका खाजगी फर्ममध्ये इलेक्ट्रीशियन म्हणून नोकरी करत होता. त्याची पत्नी अन्नपूर्णा (वय 36) मजूर म्हणून काम करत होती तर रामकृष्ण (वय 35) नावाच्या पेंटरशी तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. रामकृष्ण व्याजाने पैसे देत होता.
नारायणप्पा आणि अन्नपूर्णा यांचे रामकृष्णाशी असलेल्या कथित संबंधावरून अनेकदा वाद झाले. असाच एक वाद रविवारी दाम्पत्यामध्ये झाला. हा वाद विकोपाला गेल्याने अन्नपूर्णाने रागाच्या भरात नारायणप्पाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, जे तिने सरपण पेटवण्यासाठी बाटलीमध्ये ठेवले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रामकृष्ण त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होता.
नारायणप्पाने आग लागल्यानंतर घराबाहेर धाव घेतली. आग विझवण्यासाठी तो परिसरातील नाल्यात पडला. जेव्हा तो नाल्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होता, रामकृष्णाने त्याच्या डोक्यावर एक दगड टाकला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी अन्नपूर्णा आणि रामकृष्ण यांना अटक केली आहे. दाम्पत्याच्या तीन अल्पवयीन मुलं घरात उपस्थित असताना ही घटना घडली आहे. सर्वात मोठी मुलगी, 14 वर्षांची असून तिच्या वडिलांना ठार झाल्याचे तिने पाहिले आहे. तर इतर दोन मुली, ज्या 12 वर्षांच्या जुळ्या आहेत. त्याही घटनेवेळी उपस्थित होते.