India Coronavirus Updates : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. 9 सप्टेंबरपासून देशात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासांत 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 37,127 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
केरळमधील कोरोना प्रादुर्भावातही घट
केरळातील कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केरळात सोमवारी कोरोनाच्या 15,058 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून 43 लाख 90 हजार 489 झाली आहे. तसेच कोरोनामुळे आणखी 99 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात कोरोनामुळं 22,650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील सध्याची कोरोनास्थिती
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 62 हजार 207 रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
कोरोनाची एकूण आकडेवारी :
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 89 हजार 579
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 24 लाख 84 हजार 159
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 62 हजार 207
एकूण मृत्यू : चार लाख 43 हजार 213
एकूण लसीकरण : 75 कोटी 22 लाख 38 हजार लसीचे डोस
राज्यात काल (मंगळवारी) 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल (मंगळवारी) 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 233 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 हजार 021 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे.
राज्यात काल (मंगळवारी) 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,102 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (5), नंदूरबार (3), धुळे (1), जालना (36), परभणी (50), हिंगोली (16), नांदेड (23), अमरावती (97), अकोला (28), वाशिम (1), यवतमाळ (9), वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (5), चंद्रपूर (50), गडचिरोली (15) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 60,88,114 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,00,617 (11.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,99,192 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,883 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.